ठाण्यातून वसईच्या दिशेने जाणारा एलपीजी गॅसचा टँकर उलटल्याने घोड़बंदर रोडवरची दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा टँकर एलपीजी गॅसने पूर्णपणे भरला अाहे. त्यामुळे घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे आणि मिरा भाईंदर महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोडबंदर रोडवर काजूपाडा येथे वळण घेताना टँकरचालकाचा या टँकरवरचा ताबा सुटून तो उलटला. या उलटलेल्या टँकरपासून १०० ते २०० फूट दूर वाहनांना थांबण्यात आले असून हा रोड वाहतुकीसाठी वापरू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.आजच्या या दुर्घटनेमुळे शुक्रवारी घोडबंदर रोडवर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा अनुभव आज दुपारी देखील वाहनचालकांनी घेतला.

हा उलटलेला टँकर (एमएच ४३ वाय २५३०) भारत गॅसचा आहे. हा टँकर घोडबंदर रोडवर गायमुखच्या पुढे काजूपाडा येथे उलटला. एका दक्ष नागरिकाने कंट्रोलला फोन करून घडलेल्या प्रकारची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन, ठाणे आणि मिरा भाईंदर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. गॅस पसरू नये म्हणून फोमचा मारा या टँकरवर मारण्यात आला आहे. टँकरचे चालक आणि वाहक दोन्ही फरार असून वाहतूक पोलिसांनी या रोडवरील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. अनेक तास उलटूनही परिस्थिती नियंत्रणात यायला आणखी काही तास लागणार असल्याचा अंदाज वर्तवत वसई मीरा भाईंदर कडे जाणारी वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas tanker turns turtle thane
First published on: 03-07-2017 at 18:19 IST