वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन-रविंद्र जाडेजा यांची फिरकी जोडगोळी यांच्या माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम पहिल्या कसोटीत पाचव्या दिवशी आफ्रिकेवर निर्णायक विजय मिळवला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही. आक्रमक गोलंदाजी करत भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला आणि भारताला २०३ धावांनी विजय मिळवून दिला.

बराच काळ भारतीय क्रिकेट संघात स्थान न मिळू शकलेल्या अश्विनला पहिल्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. त्या संधीचे त्याने सोने केले. पहिल्याच डावात त्याने दमदार पुनरागमन केले. अश्विनला चांगलाच मार पडला. पण तरीही त्याने प्रतिस्पर्धी संघाचे ७ गडी तंबूत धाडले. रविंद्र जाडेजानेदखील दमदार कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात भारताला झटपट गडी मिळवून दिले. त्यामुळे आता कुलदीप यादवचे संघातील स्थान धोक्यात असल्याची चर्चा रंगली आहे. पण विराटने मात्र त्यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“आमच्या संघात केवळ स्वत:चा किंवा वैयक्तिक विचार करणारा कोणीही नाही. संघासाठी मी काय चांगले करू शकतो, याचाच प्रत्येक खेळाडू विचार करत असतो. कुलदीपच्या बाबतीतही असेच आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कुलदीप संघाबाहेर का आहे हे त्यालाही माहिती आहे. भारतात कसोटी खेळण्यासाठी कायम अश्विन आणि जाडेजा यांनाच फिरकीपटू म्हणून प्राधान्य मिळणार हे कुलदीपला माहिती आहे. कारण ते दोघेही चांगली फलंदाजी करू शकतात. कुलदीप मात्र अष्टपैलू खेळ करू शकत नाही”, असे विराटने स्पष्ट केले.

दरम्यान, पहिल्या डावात भारताने ५०२ धावांवर डाव घोषित केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकेने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात पुन्हा धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे आफ्रिकेपुढे दीड दिवसांत डोंगराएवढे आव्हान होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १९१ धावांत आटोपला.