scorecardresearch

उद्योगपतींनी किमान एक तरी प्रकल्प आणावा, त्यावर तातडीने कार्यवाही करु – मुख्यमंत्री

देशाच्या औद्योगिक स्थितीला मजबूत करण्यासाठी ‘मेड इन महाराष्ट्र’

महाराष्ट्रात उत्पादने सुरु व्हावीत यासाठी आम्ही उत्सुक असून प्रत्येक उद्योगपतींनी त्यांच्या मनातले किमान एकतरी प्रकल्प आमच्याकडे घेऊन यावा. आम्ही हे प्रकल्प तातडीने सुरु करण्याची कार्यवाही करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्यावतीने आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते. यामध्ये हर्ष गोयंका, जमशेद गोदरेज, नौशाद फोर्ब्स, थियागराजन यांनी आपले विचार मांडले. मुख्यमंत्री म्हणाले, करोनाच्या वातावरणातही उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावीशी वाटते आहे, हे फार महत्वाचे आहे. अशा सर्व उद्योग आणि गुंतवणूकदारांचे आम्ही स्वागतच करू. कालच आम्ही १६ हजार कोटी रुपये गुंतवणूकीसाठी करार केले आहेत. देशाच्या दृष्टीने ‘मेड इन इंडिया’ तर आहेच पण महाराष्ट्राचे देखील एक वैशिष्ट्य आहे.

“जिथे शक्य आहे तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्य पद्धती आपल्याला कायमस्वरूपी अवलंबता येईल, जेणेकरून करोना नंतरच्या काळातले आपले जीवन सुरक्षित आणि व्यवस्थित राहील हे ही आपल्याला पहावे लागेल. मुंबईत ५० टक्के लोक झोपड्यांत राहतात. माझ्या वडिलांनी एकेकाळी या झोपडीधारकाला घर देण्याचे स्वप्न पाहिले होते. निश्चितच आमच्यासाठी या करोना नंतरच्या काळात हा प्राधान्याचा विषय राहील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

धारावीसारख्या झोपडपट्टीत करोनामुळे हाहाकार माजेल असे वाटले होते, पण आम्ही खूप प्रयत्न केले आणि संसर्ग रोखला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कामही आमच्या प्राधान्यक्रमात आहे. येणाऱ्या काळात ऑनलाइन व्यवहारांचे आणि एकूणच दूरसंचारला येणारे खूप जास्त महत्व लक्षात घेता राज्यात सर्वदूर दर्जेदार आणि गतिमान नेटवर्कचे जाळे उभारण्यात येईल. सध्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना काही अडचणी असतील तर त्या दूर करुन या क्षेत्रांची परिस्थिती चांगली करण्यावर भर दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात काम करणारे परराज्यातील मजूर, कामगार त्यंच्या त्यंच्या राज्यात परत गेले आहेत. आम्ही त्यांना जा म्हणून सांगितले नाही. पण आता महाराष्ट्रात आम्ही कामाला सुरुवात केली आहे. उद्योगही सुरु झाले आहेत. राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही जाहिराती देऊन मनुष्यबळ उभा करु आणि येथील लोकांना नोकऱ्या देऊन कामे थांबणार नाहीत याकडे लक्ष देऊ. कृषीवर आधारित उद्योग, शीतगृह साखळी, शेतमालाचे विपणन यासारख्या गोष्टीना देखील प्राधान्य दिले जाईल. सीआयआयने विद्यापीठाचा प्रस्ताव तयार केला आहे तो त्यांनी लवकरात लवकर सादर करावा, आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Industrialists should bring at least one project lets take immediate action on it says cm uddhav thackarey aau

ताज्या बातम्या