संभाजीराजे जागे व्हा! घेराव घालत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

मी मराठा समाजाला जागे ठेवण्याचे काम आज नव्हे तर २००७ पासून करतोय. शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिले होते.

खासदार संभाजीराजे भोसले हे शनिवारी पुण्यात पुस्तक प्रकाशानाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते.
आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनाी शनिवारी पुण्यात खासदार संभाजीराजे भोसले यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. जागे व्हा, जागे व्हा, संभाजीराजे जागे व्हा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावर संभाजीराजेंनेही आंदोलकांना उत्तर देत शांत केले. ‘मराठा समाजाला जागे ठेवण्याचे काम आज नव्हे तर २००७ पासून करतोय. हे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

खासदार संभाजीराजे भोसले हे शनिवारी पुण्यात पुस्तक प्रकाशानाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. या कार्यक्रमाला जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांना गाठले. आंदोलकांनी संभाजीराजेंना घेराव घालत घोषणाबाजी केली. ‘जागे व्हा, जागे व्हा, संभाजीराजे जागे व्हा’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. या घोषणा ऐकून संभाजीराजे यांनी हसतमुखानेच आंदोलकांना उत्तर देत त्यांची बाजू मांडली.

‘मी मराठा समाजाला जागे ठेवण्याचे काम आज नव्हे तर २००७ पासून करतोय. शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. मी राज्यसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडल्यावर अन्य खासदारही लोकसभेत मराठा समाजाची बाजू मांडू लागले आहेत. ही लढाई यशस्वी व्हावी, यासाठी आपण सर्वच प्रयत्न करत आहोत. पण शांत, संयमी पद्धतीने आंदोलन करावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

आंदोलकांच्या वतीने संभाजीराजे यांना निवेदनही देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maratha quota stir protestor gherao mp sambhaji raje bhosale in pune