केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाचे वैशिष्ट्य ठरले ते मोदींनी मराठीत साधलेला संवाद. नाशिकच्या हरी ठाकूर यांच्याशी मराठीत संवाद साधला. मोदींचे मराठी ऐकून सर्वांनाच सुखद धक्का बसला.

देशातील छोट्या उद्योजकांसाठी एखादी बँक असावी, असे २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रस्तावित केले होते. यानुसार एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुद्रा योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते.

केंद्रात मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात नाशिकचे हरी ठाकूरही सहभागी झाले होते. नाशिकचे हरी ठाकूर बोलण्यासाठी उभे राहताच मोदींनी त्यांच्याशी मराठीतून संवाद साधला. ‘हरीभाऊ बोला, काय म्हणताय?. बसा, बसा. तुम्हाला मराठी येते की नाही?’ असे मोदींनी त्यांना विचारले. मात्र, त्या लाभार्थ्याला मराठी येत नव्हते. यावर मोदी हसत हसत म्हणाले, मराठी येत नाही हे चालतं का?. यानंतर मोदींनी हिंदीतून पुढील संवाद साधला. या योजनेमुळे माझे आयुष्य बदलले असे हरी गनोर ठाकूर यांनी सांगितले.

मुद्रा योजनेबद्दल मोदी म्हणाले, मुद्रा योजनेने सर्वसामान्यांमधील क्षमतेला ओळख मिळवून देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम केले. पूर्वी अर्थमंत्री मोठ्या उद्योजकांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करायचे आणि व्यवसायासाठी कर्ज घेणारी सर्वसामान्य मंडळी संपूर्ण आयुष्य सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडत बसायचे, पण मुद्रा योजनेने हे चित्र बदलले, असे मोदींनी सांगितले.