हार्बर रेल्वेच्या अंधेरी-जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या महिला डब्यातील एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी बिहारीलाल यादव (४३) हा अभिलेखावरील आरोपी असल्याचे निष्पन्न आले आहे.हार्बर रेल्वेवरून प्रवास करताना २१ सप्टेंबर रोजी एका २५ वर्षीय तरुणीचा आरोपीने विनयभंग केला. तरूणीने तात्काळ अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र जोगेश्वरी स्थानक बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने हे प्रकरण तेथे वर्ग करण्यात आले. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>> मुंबईत आकर्षक-रंगीबेरंगी खड्डे कधी बघितले आहेत का ?

रेल्वे पोलिसांतील वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हयांचा समांतर तपास विशेष पथकाच्या माध्यमातून करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. रेल्वे अभिलेखावरील आरोपींची ऑक्टोबर २०२१ मध्ये पडताळणी केली असता अटक आरोपी बिहारीलाल यादव याच्या छायाचित्राशी सीसीटीव्ही चित्रिकरणात आढळलेल्या संशयित व्यक्तीचा चेहरा मिळता जुळता असल्याचे कळले. त्याचा पूर्व इतिहास तपासून त्याच्या राहत्या पत्त्यावर शोध घेण्यात आला. महालक्ष्मी येथील जिजामातानगरमध्ये आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून यादवला ताब्यात घेण्यात आले. दादर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याची चौकशी केली असता, तो ठाण्यातील कळवा येथे राहत असून सध्या महालक्ष्मी येथे राहत असल्याचे आरोपी यादवने सांगितले. याप्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या पथकाने केला.