मोकळय़ा जागा, हरित आच्छादने, जलक्षेत्र मोठय़ा प्रमाणावर नष्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर मोकळय़ा जागा, हरित आच्छादने आणि जलक्षेत्र गमावले असून दुसऱ्या बाजूला बांधकाम क्षेत्रफळात ६६ टक्के वाढ झाली आहे. परिणामी, गेल्या २७ वर्षांत मुंबईच्या तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. भारतातील काही विद्यापीठांतील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली येथील ‘जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ’, हैदराबादचे ‘उस्मानिया विद्यापीठ’, उत्तर प्रदेशातील ‘अलिगड मुस्लीम विद्यापीठ’ या अभ्यासकांचा ‘अर्बन हीट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज/लॅण्ड-कव्हर चेंज, इन द कोस्टल सिटी ऑफ मुंबई’ हा शोधनिबंध ‘इंडियन रिमोट सेिन्सग जर्नल’ या पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. मुंबईने १९९१ ते २०१८ या काळात ८१ टक्के मोकळय़ा जागा, ४० टक्के हरित आच्छादने आणि सुमारे ३० टक्के जल क्षेत्र गमावले आहे. मात्र याच कालावधीत बांधकाम क्षेत्रफळात ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.

उपग्रहाधारित प्रतिमांचा वापर करून अभ्यासकांनी मुंबई शहर आणि उपगनरांतील एकूण ६०३ चौरस किलोमीटर प्रदेशाचा अभ्यास केला. यात १९९१ ते २०१८ या काळात झालेला जमिनीचा वापर आणि जमिनीच्या आच्छादनातील बदल, कमाल, किमान आणि सरासरी तापमानातील फरक, जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमान, झाडे-झुडपांच्या आच्छादनातील बदल विरुद्ध शहरी बांधकाम घनता या बाबी विचारात घेण्यात आल्या.

आकडेवारी काय सांगते?

मुंबईत १९९१मध्ये २८७.७६ चौरस किलोमीटर हरित आच्छादन, ८०.५७ चौरस किलोमीटर मोकळय़ा जागा, २७.१९ चौरस किलोमीटर जलक्षेत्र होते. यापैकी २०१८पर्यंत  १९३.३५ चौरस किलोमीटर हरित आच्छादन, ३३.७ चौरस किलोमीटर मोकळय़ा जागा आणि २०.३१ चौरस किलोमीटर जलक्षेत्र शिल्लक राहिले. १९९१मध्ये सरासरी तापमान ३४.०८ अंश सेल्सिअस होते. २०१८ साली ते ‘अर्बन हीट आयलॅण्ड’मध्ये ३६.२८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. म्हणजेच २.२ अंश सेल्सिअसची वाढ झाली.

अर्बन हीट आयलॅण्डम्हणजे?

जंगल आणि जलक्षेत्रे यांसारख्या नैसर्गिक ठिकाणांपेक्षा इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अशा ठिकाणी अधिक प्रमाणात सूर्याची उष्णता शोषली आणि पुन्हा उत्सर्जित केली जाते. हा भाग तापमानाच्या दृष्टीने भोवतालच्या प्रदेशापासून विलग होतो व उच्च तापमानाचे बेट तयार होते. या उष्ण बेटावरील तापमान भोवतालच्या प्रदेशाच्या तुलनेत दिवसा १ ते ७ अंश सेल्सिअसने आणि रात्री २ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक असते. अशी स्थिती निर्माण होण्यामागे बांधकामात वापरले जाणारे काँक्रीट हे प्रमुख कारण असते.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai s temperature rises due to expansion of construction sector zws
First published on: 19-10-2021 at 02:27 IST