scorecardresearch

पाकिस्तानपासून सावध राहा नाहीतर… ; ट्रम्प प्रशासनाला अमेरिकेतील थिंक टॅंकचा सल्ला

वेळ पडल्यास अमेरिकेनं पाकिस्तानवर बंदी घालावी

 

पाकिस्तानला त्याच्या शत्रूंपेक्षा त्यांनी पोसलेल्या दहशतवादी गटांपासून जास्त धोका आहे, असं मत अमेरिकेच्या थिंक टँक मानल्या जाणाऱ्या संस्थेनं व्यक्त केलं आहे. csis अर्थात सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिजने हे मत मांडलं आहे. पाकिस्तानच्या या धोरणामुळे पाकिस्तान राष्ट्र म्हणूनच संकटात येऊ शकतं असंही मत या संस्थेनं व्यक्त केलं आहे.
सद्यस्थितीत पाकिस्ताननं तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि तत्सम दहशतवादी गटांची शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानचं हे धोरण त्यांनाच संकटात आणू शकतं. पाकिस्ताननं तालिबानची मदत करणं बंद केलं नाही तर त्यावर बंदी आणावी असा सल्लाही या संस्थेनं ट्रम्प प्रशासनाला दिला आहे. पाकिस्ताननं जर तालिबानची मदत करणं थांबवलं नाही तर अमेरिका पाकिस्तानची कोणतीही मदत करणार नाही. असा इशारा अमेरिकेनं पाकिस्तानला द्यावा असंही मत या संस्थेनं व्यक्त केलं आहे. तसंच वेळ पडल्यास पाकिस्तानची आर्थिक रसदही रोखावी असंही सीएसआयएसनं म्हटलं आहे. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलं आहे तेव्हापासून पाकिस्तानविरोधात त्यांनी कठोर पावलं उचलली आहेत. अशा स्थितीत अमेरिकेच्या थिंक टँक मानल्या जाणाऱ्या संस्थेनं व्यक्त केलेलं हे मत ट्रम्प यांच्या पाकिस्तानसंदर्भातल्या धोरणाला बळ देणारं ठरलं आहे.

काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये १०० पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यावेळी अफगाणिस्तान सरकारनं यामागे पाकचा हात असल्याचा आरोप केला होता. आता सीएसआयस या संस्थेनं केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानवरचा दबाव वाढणार यात शंका नाही.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब राष्ट्रांचा दौऱा केला होता.यावेळी झालेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलू दिलं गेलं नव्हतं. शरीफ यांनी त्यांचं भाषण लिहून आणलं होतं. मात्र त्यावेळी त्यांना भाषण करण्यास बंदी करण्यात आली होती. तसंच पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीतही कपात करण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सीएसआयस या थिंक टँकनं व्यक्त केलेलं मत म्हणजे नव्या बदलांची नांदी आहे. येत्या काळात अमेरिकेनं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली तर आश्चर्य वाटायला नको.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistan more of a threat than an ally csis

ताज्या बातम्या