नगर रस्ता परिसरात जीपमध्ये झोपलेल्या चालकाला धमकावून चोरट्याने जीप चोरली. त्यानंतर चोरलेल्या जीपमधून चोरटा पसार झाला. वानवडी परिसरात एका पादचाऱ्याला त्या भरधाव जीपने धडक दिली. या घटनेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरलेली चार वाहने जप्त करण्यात आली. चोरट्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

रोहित रामप्रताप वर्मा (वय २२, रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या बरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वर्मा सराईत गुन्हेगार आहे. दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. वर्मा आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी हडपसर भागात संशयावरुन पकडले. त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली. कोंढवा परिसरातील साळुंखे विहार रस्ता परिसरात एका दुचाकीस्वाराला धमकावून वर्मा आणि अल्पवयीन मुलाने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी चार दिवसांपूर्वी पहाटे नगर रस्त्यावर जीपमध्ये झोपलेल्या जीपचालकाला धमकावून जीप चोरल्याचे उघडकीस आले. चोरलेले जीप चोरून वर्मा आणि साथीदार पसार झाले. वानवडीतील गणेशनगर भागात वर्माबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराचे नियंत्रण सुटले आणि एका पादचाऱ्याला जीपने धडक दिली. या घटनेत जीपचालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघेजण जीपमधून पसार झाले होते. दोघांनी कोंढवा, वानवडी, हडपसर, हिंजवडी परिसरातून वाहने चोरली असून सात गुन्हेे उघडकीस आले आहेत. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर राजेश अभंगे, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विकांत सासवडकर आदींनी ही कारवाई केली.