पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आता तर केवळ पेट्रोलच नाही, तर डिझेलच्या दरानेही शंभरी गाठली आहे. वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. मात्र, वाढत्या दरातही वाहनधारकांसाठी चांगली बातमी आहे. मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एक पेट्रोल पंप मालक लोकांना ५ ते १० टक्क्यांपर्यंत मोफत पेट्रोल देतोय. सध्या सणासुदीचा काळ आहे म्हणून ही ऑफर दिली जात नाहीये. तर, या पंप मालकाच्या घरी मुलगी झाल्याने मोफत ज्यादाचं पेट्रोल वाटण्यात येतंय. बैतूलमधील सेनानी कुटुंबीय त्यांच्या घरी मुलीच्या जन्माचं स्वागत मोफत पेट्रोल वाटून करत आहेत.
पेट्रोल पंपाचे मालक सेनानी नवीन चिमुकलीचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना अधिक पेट्रोल देऊ करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैतूलच्या राजेंद्र सेनानीची भाची शिखाने ९ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. नवरात्रीच्या दिवशीच सेनानी कुटुंबात मुलीचा जन्म झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हाच आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी ग्राहकांना अतिरिक्त पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला. १३ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत पेट्रोल पंपांवर येणाऱ्या ग्राहकांना ज्यादाचे पेट्रोल मोफत दिले जाणार आहे.
नेमकी ऑफर काय..
तर, या ऑफरमध्ये १०० रुपयांचे पेट्रोल घेतल्यावर १०५ रुपयांचे पेट्रोल दिले जाईल. तर, १०० रुपयांपेक्षा जास्त आणि ५०० रुपयांपर्यंत पेट्रोल घेणाऱ्या ग्राहकांना १०% अधिक पेट्रोल दिले जाईल. पेट्रोल पंप मालक राजेंद्र सेनानी याबद्दल म्हणाले, की आमच्या घरी मुलीचा जन्म झाल्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही मोफत अतिरिक्त पेट्रोल देत आहोत.