जागतिक मृदादिनी कृषी शास्त्रज्ञांचे आवाहन

डहाणू :  सिंचनासाठी पाण्याचा अवाजवी  वापर, कालवे- धरणे यामधून होणारा सततचा पाझर, सदोष पाणी निचरा आणि भरतीमुळे समुद्रातील खाऱ्या पाण्याचा शिरकाव यांसारख्या विविध कारणांमुळे जमिनीचे क्षारीकरण होत असून  ते थांबवण्याची गरज आहे. क्षारीकरण थांबवण्यासाठी योग्य मशागत पद्धत, बंधारे बांधणे, सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे, पाण्याचा योग्य निचरा करणे, पिकांची फेरपालट आणि क्षार सहनशील पिकांची लागवड करणे इत्यादी उपाययोजना करून जमिनीची उत्पादकता वाढवा, असे आवाहन कृषी  विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी कोसबाड येथे  आयोजिलेल्या जागतिक मृदादिनी कार्यक्रमात केले.

या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, आरसीएफचे विपणन अधिकारी श्रीकृष्ण गोवेकर, सर नेस वाडिया फाऊंडेशनचे व्यवस्थापक राहुल सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. विलास जाधव यांनी क्षारीकरण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती देऊन जमीन सुधारणेसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार खतांचा पुरवठा करणे सोपे जाते. खारपट व चोपण जमिनी सुधारण्यासाठी माती परीक्षणाचा फायदा होऊन पिकांस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल राखता येतो याविषयी माहिती दिली.

सर नेस वाडिया फाऊंडेशनचे व्यवस्थापक राहुल सिंग यांनी आधुनिक शेतीसाठी माती परीक्षण करणे गरजेचे असून त्याद्वारे पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असे सांगितले. आरसीएफचे अधिकारी श्रीकृष्ण गोवेकर यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी आरसीएफच्या माती परीक्षण प्रयोगशाळेतून मोफत माती नमुना तपासून घेण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत सारणीचे सदस्य भरत भोईर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.  कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर यांनी माती परीक्षण अहवाल वाचन करून शिफारशीनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण केले तसेच एकात्मिक शेती पद्धतीतून अधिक उत्पादन मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी केले.