आता १० डिसेंबरची प्रतिक्षा

मनमाड : एक डिसेंबरपासून राज्यातील सर्व प्राथमिक  शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असला तरी ग्रामीण भागातील प्राथमिक  शाळा १० डिसेंबरनंतरच सुरू होऊ शकतील, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने मनमाड शहरातील प्राथमिक शाळांची घंटा बुधवारी वाजलीच नाही. मंगळवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याची माहिती शाळा आणि पालकांपर्यंत न पोहोचल्याने पालक मुलांना घेऊन शाळेत दाखल झाले पण त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागले.

बुधवारी सकाळी नगरपालिका शिक्षण मंडळांसह विविध खासगी शाळांचे आवार पालक आणि विद्यार्थ्यांनी गजबजून गेले होते. परंतु, शाळा सुरू होणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तरीही विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. तब्बल दीड वर्षांनंतर विद्यार्थी एकमेकांना भेटले. गप्पाही रंगल्या. पण शाळा सुरू होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

शहरातील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या १६ शाळा आणि खासगी १२ शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्याने आढळलेल्या विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती बळावली आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेतही द्विधा मनस्थिती झाल्याचे बघायला मिळत होते. आता ग्रामीण भागातील प्राथमिक  शाळाही १० डिसेंबरनंतरच सुरू करण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.