नागरिकांच्या आरोग्याचा प्रशद्ब्र
वसई : आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देण्यासाठी शासनाने खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वसईच्या अर्नाळा येथील भागात या योजनेतून दिलेले धान्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
करोनाच्या संसर्गामुळे अडचणीत सापडलेल्या आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने खावटी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ९ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात आला आहे. या योजनेतून चार हजार रुपये कुटुंब अनुदान देण्यात येत आहे. यात दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू व दोन हजार रुपये रोख रक्कम आदिवासी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. अर्नाळा ग्रामपंचायत भागात जे खावटी योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यात एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूरडाळ, साखर, तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मिठ, चहापत्ती असा दोन हजारांपर्यंतच्या वस्तूंची बंदिस्त पाकिटे देण्यात आली आहेत. यात तूरडाळ व चणे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. तूरडाळीमध्ये अळी पडून त्याचे गठे तयार झाले आहेत व त्यातून उग्र वासही येत आहे. तर देण्यात आलेल्या चणे ही छिद्र पडलेलाी देण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने ज्यांचे हातावर पोट आहे अशा बांधवांना करोनाकाळात आधार मिळावा यासाठी ही योजना लागू केली आहे. मात्र सध्या स्थितीत देण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या जीवनावश्यक वस्तूंमुळे नक्की शासन आम्हा आदिवासी बांधवांना जगवण्याचे काम करीत आहे की मारण्याचे काम करीत आहे असा संतप्त सवाल आदिवासी एकजूट संघटनेचे अध्यक्ष शेरू वाघ यांनी उपस्थित केला आहे.
धान्यवाटप करताना देण्यात आलेले धान्य योग्य दर्जाचे आहे की नाही याची तपासणी करायला हवी होती. तसे न झाल्याने निकृष्ट दर्जाचे अन्न धान्य गोर गरिबांच्या माथी मारण्याचे काम केले जात असल्याचा आरोप शेरू वाघ यांनी केला आहे.
खराब व निकृष्ट दर्जाच्या वस्तूचे वाटप करून आदिवासी बांधवांची फसवणूक केली जात आहे.व आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळण्यांचे काम शासनाने चालविले आहे. याला जबाबदार नेमके कोण आहे याची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच वाटण्यात आलेल्या खराब व निकृष्ट वस्तूंची पाहणी करुन पुन्हा चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे वाटप करण्यात यावे, असे आदिवासी एकजूट संघटनेचे अध्यक्ष शेरू वाघ यांनी सांगितले. खावटी योजनेतून आतापर्यंत सर्वांना वाटप करण्यात आलेल्या वस्तू या चांगल्या दर्जाच्या दिल्या आहेत. जर एखाद्या ठिकाणी असा प्रकार घडला असेल तर त्यांची तपासणी करून पुन्हा त्यांना नव्याने खावटीचे किट दिले जातील, डहाणू प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.