08 August 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : राजकीय कुबड्या

आपल्याला खाली ओढणारे हात खूप आहेत. ते फक्त आता आपल्याला खाली ओढायला जागा बघतात. आणि एकदा का आपण खाली पडलो, की ते आपल्या उरावर

| September 12, 2014 01:15 am

लोकांच्या साशंक नजरेने हळूहळू विद्याची मानसिकताही तीच झाली. आपल्याला समाजच त्यांच्यासाठी काही करून देत नाही. आपल्या मनातल्या चांगला भाव त्यांना दिसत नाही.
अशा अवस्थेत तिला विरोधी मंडळी आणि समाज यांच्या कात्रीत सापडल्यासारखं झालं. समाजाच्या भूमिकेचा फायदा विरोधक घ्यायला लागले. तेव्हा मात्र विद्याला सगळंच असह्य झालं. अशा अवस्थेत आपल्याला चार लोक सांभाळून राहण्याशिवाय पर्याय नाही याची तिला खात्री झाली.
या सर्व गोष्टी सहन होत नाही म्हणून इथून मागे फिरणं आता तिला मानवणारं नव्हतं. असं करण्याने आपल्या अप्रामाणिकपणाची कबुली दिल्यासारखंही होतं. तेव्हा आता पर्याय एकच. आपली डागाळलेली प्रतिमा उंचावण्यासाठी काही दिवस आपल्या खुर्चीचं रक्षण. आणि मग त्यासाठी दावणीला काही माणसं.
त्यामुळे पाय तुटलेल्या माणसाला कुबडय़ांची गरज लागावी, तशी विद्याला हाताशी चार लोकांची गरज वाटू लागली.
दिवस असेच पुढे ढकलायचे असतील तर सतूसारखी, सदाभाऊसारखी लोकं हाताशी पाहिजेत. कारणाने किंवा विनाकारणाने वाजणारी लोकांची तोंडं बंद करायची असतील तर या सर्व गोष्टी गरजेच्याच आहेत. राजकारणातल्या वाटा एकटय़ा माणसाने चालण्यासारख्या नसतातच. या वाटांवर धोके, कपट, विश्वासघात दबा धरूनच असतात. कधी पुढय़ात काय येईल ते सांगता येत नाही. तेव्हा या वाटेने चालताना मोठय़ा तयारीनेच चालावं लागतं.
आमदार होईपर्यंत विद्या कधी या वाटेला गेली नव्हती. त्यामुळे या वाटेतल्या अडथळ्यांची तिला कल्पनाही नव्हती. याउलट प्रकाश मात्र या वाटांवर अनेकदा ठेचा खाऊन रक्तबंबाळ झालेला. म्हणूनच सत्ता घरात आल्यापासून तो मोठय़ा सावधगिरीने चालला आहे.
विद्याला आता कुठं इथले खाचखळगे दिसायला लागलेत. प्रकाशचं टारगट  माणसं हाताशी घरण्याचं गुपित तिला आता कुठं कळायला लागलं. इथं पाय रोवून राहायचे असेल, तर अशा गोष्टींशिवाय पर्याय नाही.
परिस्थिती लक्षात घेऊन तिनं प्रकाशला कोणत्याच बाबतीत अडवणं बंद केलं.
 पहिल्यांदा सतूचं घरी येणं तिला खटकायचं. पण आता तो प्रकाशबरोबर वरचेवर येऊ लागला. कार्यालयातही आता प्रकाशचं आणि त्याच्या माणसांचंच राज्य सुरू झालं. या वातावरणात विद्यातल्या एका आदर्श कार्यकर्तीचं मन मात्र आतल्या आत कुढत राहिलं. बुद्धीने मनावर विजय मिळविला असला, तरी ती मनाला मारू शकत नव्हती. किंवा कायमची बाजूलाही ठेवू शकत नव्हती.
तिच्या अशा मानसिक हिंदोळ्यावरच्या अवस्थेतच एक घटना घडली.
सतूने रोहिदासला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली.
बातमी तालुकाभर पसरली.
जामगावमधील युवक मंडळाच्या अध्यक्षाला मारहाण.
सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सतू आणि रोहिदासच्या फोटोसह बातमी.
सतू प्रकाशचा मित्र आणि प्रकाश आमदारीणबाईंचा नवरा. ओघानेच सतू विद्याचा माणूस. त्यातच तो तिच्याच पार्टीचा कार्यकर्ता. आपोआपच विद्याच्या नावाने पुन्हा एककदा तालुकाभर ओरड सुरू झाली.
अण्णासाहेबांना विद्याचे पाय उखडण्याची एक नवी संधी मिळाली.
आजपर्यंतचा अनुभव आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तालुक्यातल्या तरुणांना एकत्र करण्यास सुरुवात केली. तत्त्वानी चालणारा आदर्श कार्यकर्ता म्हणून रोहिदासला दूर सारणारे अण्णासाहेब आता त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करू लागले.
आणि भांडणानंतर आठ दिवसांनी अण्णासाहेबांच्या सांगण्यावरून रोहिदासने पोलिसात तक्रार केली. प्रकाश या गोष्टी गृहीत धरून आधीच तयारीत होता. सतूला अटक झाल्याबरोबर त्याने त्याला जामीनावर सोडवून आणला.
पण खटला चालू झाला.
विद्या जर यात गोवल्या गेली तर तिला जड जाणार, कारण त्यामुळे संपूर्ण तालुक्यातली तरुण पिढी एका बाजूला उभी राहणार होती. ही सक्रिय पिढी कधीही लोकमत बदलू शकते. आणि एकदा लोकमत बदललं की राजकारणातलं अस्तित्व संपलं म्हणून समजा.
पण प्रकाश आता या राजकारणात कच्चा राहिला नव्हता. राजकारणात पडल्यापासून तो अण्णासाहेबांच्या डावपेचाचं निरीक्षण करत होता.
आता वेळ होती त्यानी स्वत: डाव खेळण्याची.
परिस्थिती लक्षात घेऊन त्याने अण्णासाहेबांची माणसंच फोडायला सुरुवात केली. अण्णासाहेबांना पहिला झटका मिळाला तो चेअरमनकडून.
 सत्तेपुढं चांगल्या चांगल्यांची तपस्या भंग होते. तिथं चेअरमनसारख्या स्वार्थी लोकांची काय तऱहा.
सत्तेला काही लोक भाळतात. काहींना आमिष दाखवावं लागतं तर काही धाकाला बळी पडतात.
इथं माणसं फोडण्यासाठी प्रकाशने वापरता येतील तेवढी सगळी तंत्र वापरली. आणि चेअरमन कांबळेसरांसारखी अण्णासाहेबांच्या पोटात शिरून बोलणारी माणसं आपल्या दावणीला बांधली.
आता प्रश्न राहिला रोहिदासच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तालुक्यातल्या तरुणांचा.
इथं त्याला अण्णासाहेबांच्या बैठकीत तयार झालेलं चेअरमनचं डोकं वापरता आलं आणि सहा महिन्यांनी येणाऱया ग्रामपंचायत निवडणुकीत संधी देण्याचं आमिष दाखवून बहुतेक तरुणांना आपलंसं केलं.
रोहिदासला झालेल्या मारहाणीने तालुक्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण गढुळ झालं होतं. पण प्रकाशने घडवून आणलेल्या उलथापालथीने सगळं निवळलं. रोहिदासचं प्रकरण गाळासारखं तळाला जाऊन बसलं आणि विद्याने सुटकेचा श्वास सोडला.
कारण नसताना अडकलेल्या प्रकरणातून ती सुटली. पण ती केवळ या सुटकेच्या आनंदाने भुरळून जाणारी नव्हती.
या सर्व प्रकरणाकडे तिनं गांभीर्याने पाहिलं, तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्याला खाली ओढणारे हात खूप आहेत. ते फक्त आता आपल्याला खाली ओढायला जागा बघतात. आणि एकदा का आपण खाली पडलो, की ते आपल्या  उरावर नाचलेच म्हणून समजा. अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, तर एकतर ते हात आपण आपलेसे केले पाहिजेत किंवा छाटले तरी पाहिजेत.
इथं असे हात आपलेसे करणं फारसं अवघड नाही हे तिला प्रकाशने सिद्ध करून दाखवलं. तेव्हा तिनंही आपले हात प्रकाशपुढे जोडले.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 40 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : तत्त्वांना तिलांजली
2 ऑनलाईन मालिका : योजनांची खिरापत
3 ऑनलाईन मालिका : राजकारणातील घोटाळे
Just Now!
X