कृषी क्षेत्रातील विविध संधी आणि या क्षेत्राशी संबंधित विकसित होणाऱ्या नव्या विद्याशाखांची, नव्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती-
कृषी अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कृषी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनव्या संधी. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठीही आज कृषी क्षेत्र आदर्श ठरत आहे. कृषीविषयक पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आज ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये कृषी विषयाशी संबंधित संधी उपलब्ध होत आहेत.   
करिअर संधी
राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांमध्ये तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते. कृषी विद्यापीठांना तज्ज्ञ प्राध्यापकांची गरज भासते. त्याचबरोबर विद्यापीठांना प्लँट पॅथॉलॉजिस्ट, ब्रीडर, इकॉनॉमिक बॉटनिस्ट, अ‍ॅग्रोनॉमिस्ट यासारख्या स्पेशलायझेशन केलेल्या कृषितज्ज्ञांची आवश्यकता भासते. कृषीविषयक पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संधी मिळू शकतात.
*    सीड प्रॉडक्शन असिस्टंट, प्लँट सायकॉलॉजिस्ट, व्हेजिटेबल बॉटनिस्ट, सीड रिसर्च ऑफिसर, एन्टॉमॉलॉजिस्ट, बॅक्टेरिऑलॉजिस्ट, बॉटनिस्ट, सॉईल केमिस्ट, फ्रूट ब्रीडर, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, मृद संधारण अधिकारी.
*    इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च या संस्थेत विविध कृषीविषयक तज्ज्ञांची व तांत्रिक साहाय्यकांची गरज भासते.
*    कृषी पदवीधरांना राज्य सरकारच्या प्रवर्ग एक आणि दोनच्या पदावर राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांद्वारे थेट नियुक्ती मिळू शकते. प्रवर्ग एकमध्ये नियुक्त झालेले विद्यार्थी भविष्यात पदोन्नतीने कृषी संचालक या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. कृषी पदवीधरांना वन खात्यासाठी आवश्यक असणाऱ्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि साहाय्यक वनाधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसता येते. या पदवीधराला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय वन सेवेच्या परीक्षेला बसता येते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांची निवड थेट उपवनसरंक्षक म्हणून केली जाते. हे विद्यार्थी भविष्यात राज्याचे मुख्य वनसंरक्षक बनू शकतात.
*    गेल्या काही वर्षांत सार्वजनिक बँकांनी कृषी पदवीधरांची मोठय़ा प्रमाणावर क्षेत्रीय अधिकारी (फिल्ड ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली आहे. यापुढे बँकांचे लक्ष हे अधिकाधिक ग्रामीण क्षेत्रात विस्तार करण्याचे राहणार असल्याने त्यांना मोठय़ा संख्येने क्षेत्रीय अधिकाऱ्यांची गरज भासू शकते. त्यामुळे कृषी पदवीधरांना ही संधी मिळू शकते.
*    वेगवेगळ्या बियाणे कंपन्यांमध्ये कृषी पदवीधरांना तांत्रिक साहाय्यक, क्षेत्र व्यवस्थापक (फार्म मॅनेजमेंट), संशोधक, बियाणे खरेदी-विक्री, श्रेणी निर्धारण, पॅकेजिंग, भूमी निरीक्षण वा परीक्षण यासारख्या कामांसाठी संधी मिळू शकते.
*    आपल्या देशात कृषिमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाचीही चांगलीच वाढ होत आहे. या क्षेत्रासाठीसुद्धा या विषयातील अभियंते, संशोधक, तंत्रज्ञ, विक्री-विपणन व्यवस्थापक आणि निर्मितीसाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते.
कृषी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया
इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झामिनेशन (एआयईईए- यूजी-२०१४) द्वारे इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्चच्या अभिमत विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या ‘एनडीआरआय कर्नाल’ या संस्थेत पदवी अभ्यासक्रमासाठीच्या १०० टक्के जागा भरल्या जातात. अर्हता- खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान परीक्षेत सरासरीने ५० टक्के आणि राखीव संवर्गातील उमेदवारांना ४० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.
स्टेट अ‍ॅग्रिकल्चर युनिव्‍‌र्हसिटी, सेंट्रल अ‍ॅग्रिकल्चर युनिव्‍‌र्हसिटी- इम्फाळ, सेंट्रल युनिव्हर्सिटी वुईथ अ‍ॅग्रिकल्चर फॅकल्टी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, विश्वभारती कोलकाता, नागालॅण्ड युनिव्हर्सिटी,  एसएचआयएटीएस अलाहाबादमधील १५ टक्के जागा भरल्या जातात. यंदापासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. ऑफलाइन अर्जसुद्धा करता येतो. ही परीक्षा दरवर्षी साधारणत: एप्रिल महिन्यात घेतली जाते. पत्ता- कृषी अनुसंधान भवन, २ पुसा, न्यू दिल्ली- ११००१२. वेबसाइट- http://www.iacar.org
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेले अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
*    डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
बी.एस्सी. (कृषी), बी.एस्सी. (फलोद्यान), बी.एस्सी. (फॉरेस्ट्री), एम.एस्सी (कृषी), पीएच.डी. (कृषी), बी.टेक्. (कृषी अभियांत्रिकी), एम.टेक्. (कृषी अभियांत्रिकी).
*    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर  
या विद्यापीठामध्ये पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत- बीएस्सी(कृषी), बीएस्सी (फलोद्यान), एमएस्सी (कृषी),  एमएस्सी (कृषी), कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम, पीएच.डी. (कृषी), बी.टेक्. (कृषी अभियांत्रिकी), एम.टेक्. (कृषी अभियांत्रिकी)
*    मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
बीएस्सी (कृषी), बीएस्सी (फलोद्यान), एम.एस्सी. (कृषी), पीएच.डी. (कृषी), बी.टेक््. (फूड सायन्स) – एम.टेक्. (फूड सायन्स), बी.टेक्. (कृषी अभियांत्रिकी), एम.टेक्. (कृषी अभियांत्रिकी), बी.एस्सी. (होम सायन्स), एम.एस्सी. (होम सायन्स), पीएच.डी. (होम सायन्स)
*    डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
या विद्यापीठामध्ये पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-  बी.एस्सी. (कृषी), बी.एस्सी. (फलोद्यान), एम.एस्सी.(कृषी),  बी.एस्सी.(फॉरेस्ट्री), पीएच.डी. (कृषी), बी.टेक्. (कृषी अभियांत्रिकी), बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (बीए.एफस्सी.),  मास्टर ऑफ फिशरी सायन्स (एमए.एफएस्सी.), पीएच.डी. (फिशरी).
कृषी क्षेत्रातील व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* मास्टर्स प्रोग्रॅम इन अ‍ॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट
पुणेस्थित सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सिम्बायसिस इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस या संस्थेने मास्टर्स प्रोग्रॅम इन अ‍ॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी ५० टक्के गुणांसह कृषी पदवी घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. शिवाय कृषी वा कृषी आधारित उद्योगांसाठी तीव्र आवड वा अनुभव असलेल्या इतर कोणत्याही शाखेतील ५० टक्के  गुणांसह पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येतो. प्रवेशासाठी सिम्बॉयसिस नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागेल. एसएनएपी टेस्ट, समूह चर्चा, मुलाखती, मानसशास्त्रीय चाचणी आणि लेखी संवादसंप्रेषण (कम्युनिकेशन) याद्वारे निवड केली जाते. पत्ता- सिम्बॉयसिस इन्फोटेक कॅम्पस, प्लॉट नं. १५, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, एमआयडीसी, हिंजेवाडी, पुणे-४११०५७.
वेबसाइट- http://www.siu.edu.in, ईमेल- info@snaptest.org
* एमबीए इन अ‍ॅग्री बिझनेस
गोविंद वल्लभ पंत अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ अ‍ॅग्री बिझनेसने एमबीए इन अ‍ॅग्री बिझनेस हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- ६० टक्के गुणांसह कृषी, कृषी अभियांत्रिकी, दुग्धव्यवसाय तंत्रज्ञान, फूड सायन्स/ तंत्रज्ञान, मत्स्यव्यवसाय, गृहविज्ञान, पशुवैद्यकशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयात पदवी वा पदव्युत्तर पदवी. पत्ता : कॉलेज ऑफ अ‍ॅग्री-बिझनेस, गोविंद वल्लभ पंत युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, पंतनगर- २६३१४५. वेबसाइट- http://www.gbpuat.ac.in
* पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन अ‍ॅग्री-बिझनेस
चौधरी चरणसिंघ नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंग ही संस्था केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन अ‍ॅग्री-बिझनेस हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम कृषी विषयातील पदवीधर किंवा कृषीशी निगडित साहाय्यभूत अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करता येतो. पत्ता : चौधरी चरणसिंघ, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंग, जयपूर- ३०३९०६.
वेबसाइट- http://www.ccsniam.gov.in
ईमेल- pgcell@ ccsniam.gov.in