संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘इंडियन इन्स्टिटय़ूूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ या अग्रगण्य संस्थेने सुरू केलेल्या बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स (बीएस-एमएस) या पाच वर्षांच्या ‘डय़ुएल डिग्री प्रोग्रॅम’चा अभिनव पर्याय उपलब्ध आहे. त्याविषयी..

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च ही देशातील मूलभूत विज्ञान विषयातील संशोधन कार्याला प्राधान्य देणारी अग्रगण्य संस्था आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थेची स्थापना yash5२००६ साली केली. २०१२ साली या संस्थेला ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंपार्टन्स’चा खास दर्जा देण्यात आला आहे. विज्ञान शिक्षण आणि संशोधनाचा एकात्मिक संयोग या संस्थेत साधला जातो. संशोधनासाठी अत्याधुनिक संशोधन साहित्य आणि उपकरणे या संस्थेत उपलब्ध असतात. ही संस्था पुणे, मोहाली, भोपाळ, कोलकाता आणि थिरुवनंतपूरम येथे कार्यरत आहे.  या संस्थेला स्वायत्तता मिळाली असून संस्थेमार्फत पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टोरल अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ही संस्था पदवी स्वत: प्रदान करते.
बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स
या संस्थेत बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स (बीएस-एमएस) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्याशिवाय डॉक्टोरल अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.
या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, समस्या निवारण, संवाद कौशल्य, संगणकीय कौशल्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रमेंटेशन आणि प्रयोगशाळेतील हाताळणी संदर्भातील कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो.
अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया :
संस्थेत सुरू करण्यात आलेल्या ‘बीएस-एमएस’ या अभ्यासक्रमासाठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम ‘डय़ुएल डिग्री प्रोग्रॅम’ या नावाने ओळखला जातो. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षांत विज्ञान शाखेच्या मुख्य विषयांवर भर दिला जातो. पुढील दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या स्पेशलायझेशन विषयांचा अभ्यास करता येतो. पाचव्या वर्षांत प्रोजेक्ट वर्कवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना संशोधन व विकास क्षेत्र, अध्यापन क्षेत्र आणि संशोधन आधारित उद्योगांमध्ये करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात होतो.
तीन पद्धतींनी एकूण हजार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
=    किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मूलभूत विज्ञान विषयात २०१३-१४ आणि २०१४- १५ या वर्षांत निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळतो.
=    बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण आाणि आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE-ADVANCED या परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो. संस्थेतील ५० टक्के जागा या पद्धतीने भरल्या जातात. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना आणि JEE-ADVANCED या परीक्षेत उच्च गुण मिळालेले जे विद्यार्थी संस्थेतील अभ्यासक्रमासाठी अर्ज करतात, त्यांचा प्रवेशासाठी विचार केला जातो. त्यामुळे खास असे कट-ऑफ गुण ठरवण्यात येत नाहीत.
=    उर्वरित ५० टक्के जागा या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे भरण्यात येतात. ही चाचणी सरसकट कोणत्याही विद्यार्थ्यांला देता येत नाही. त्याचे काही निकष संस्थेने निर्धारित केले आहेत. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमार्फत INSPIRE शिष्यवृत्तीसाठी प्राप्त उमदेवारांचे कट ऑफ गुण प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंडळासाठी दरवर्षी घोषित केले जातात. (२०१४ सालासाठी महाराष्ट्रातील बोर्डासाठी हे कट-ऑफ गुण ७८.७ टक्के होते. ही माहिती http://www.inspire-dst.gov.in या संकेतस्थळावर घोषित केली जाते. हे सर्व विद्यार्थी अप्टिटय़ूड टेस्टला बसू शकतात. नॉन क्रिमी लेअर, इतर मागासवर्ग आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग विद्यार्थ्यांसाठी या कट-ऑफ गुणांमध्ये पाच टक्के सवलत दिली जाते. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेतील गुणांमध्ये पाच टक्के सवलत दिली जाते.
एखादा विद्यार्थी या तीन पद्धतींच्या निकषांमध्ये पात्र ठरत असल्यास प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतो. मात्र, तिन्ही प्रक्रियांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो व या प्रकियेचे शुल्कही भरावे लागते. या संस्थेमध्ये केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग या प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात.
या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.
प्रवेश प्रक्रिया- ही प्रक्रिया १ जून २०१५ पासून सुरू होईल. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना आणि JEE- ADVANCED परीक्षा गटाद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ जून २०१५. या गटातून अर्ज केलेल्या उमदेवारांची निवड यादी २९ जून २०१५ ला घोषित केली जाईल. निवड झालेल्या या गटातील उमेदवारांनी १० जुल २०१५ पर्यंत शुल्क भरणे आवश्यक आहे.
अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुल २०१५ आहे. ही चाचणी १२ जुल २०१५ रोजी होईल. या चाचणीवर आधारित अंतिम निवड यादी १५ जुल २०१५ रोजी घोषित केली जाईल. या उमेदवारांना २२ जुल २०१५ पर्यंत फी भरून आपला प्रवेश निश्चित करावा लागेल.
अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयावर प्रश्न विचारले जातात. प्रत्येकी १५ प्रश्न असे एकूण ६० प्रश्न विचारले जातात. अभ्यासक्रम ‘एनसीईआरटी’च्या अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. आता राज्य बोर्डाचा अभ्यासक्रमही याच स्तरावर आणल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ही चाचणी देणे कठीण जाऊ नये. बारावीमध्ये जीवशास्त्र अथवा गणित हे विषय न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही चाचणी देता येते. मात्र, त्यांना चाचणीसाठी या दोन्हीही विषयांचा अभ्यास करावा लागेल. हे प्रश्न बहुपर्यायी पद्धतीचे असतात. प्रत्येक अचूक उत्तराला ३ गुण दिले जातात आणि चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण कमी केला जातो. ही परीक्षा देशभरातील १७ केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या केंद्रांचा समावेश आहे.
अर्ज कसा कराल?
अर्ज ऑनलाइन करावा लागतो. पत्ता- चेअरमन, जॉइन्ट अ‍ॅडमिशन कमिटी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, थिरुवनंतपूरम कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, थिरुवनंतपूरम कॅम्पस, त्रिवेंद्रम- ६९५०१६.

नया है यह!

एम.ए. इन बुद्धिस्ट स्टडीज अ‍ॅण्ड सिव्हिलायझेशन
हा अभ्यासक्रम गौतम बुद्ध विद्यापीठाने सुरू केला आहे. या विद्यापीठाची स्थापना उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे. पत्ता- अ‍ॅडमिशन ऑफिस, गौतम बुद्ध युनिव्हर्सटिी,
यमुना एक्सप्रेस वे, ग्रेटर नॉयडा, जिल्हा- गौतमबुद्ध नगर,
उत्तर प्रदेश- २०१३१२. वेबसाइट- http://www.gbu.ac.in
ई मेल-  admissions@gbu.ac.in