उत्तराखंडमधील एका जागेसाठी गुरूवारी मतदान संपातच देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला. यामध्ये पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपच सत्तेवर येईल असा अंदाज बहुतांश सर्वच एक्झिट पोल वर्तवणाऱ्या संस्थांनी म्हटले आहे. पण समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांनी एक्झिट पोलचे सर्व आकडे हे असत्य असल्याचे सांगत वृत्त वाहिन्यांनी दबावाखाली सर्व आकडे बदलल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत आपल्याकडे ठोस माहिती असल्याचेही त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.
एक्झिट पोलचे आकडे हे काही दिवसांपूर्वी दबावात येऊन बदलल्याची माहिती माझ्याकडे आहे, असे त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. गुरूवारी सांयकाळी यूपी, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकांनंतर एक्झिट पोल प्रसारित करण्यात आले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडी दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. तर भाजप आघाडीवर आहे. तिसऱ्या क्रमांकावर बसप दिसून येते. पण स्पष्ट बहुमत कोणाकडेच नसल्याचे एकंदर एक्झिट पोलवरून दिसते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाची काँग्रेसबरोबर आघाडी करण्यामध्ये रामगोपाल यादव यांची महत्वाची भूमिका होती.

असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज
सीएनएन आयबीएन : सप+काँग्रेस (१२०), भाजप (१८५), बसप (९०), इतर (९)
इंडिया टुडे : सप+काँग्रेस (१२०), भाजप (१८५), बसप (९०), इतर (९)
इंडिया न्यूजः सप+काँग्रेस (१२०), भाजप (१८५), बसप (९०), इतर (८)
टाइम्स नाऊ : सप+काँग्रेस (११०-१३०), भाजप (१९०-२१०), बसप (५७-७४)
एबीपी न्यूज: सप+काँग्रेस (१५६-१६९), भाजप (१६४-१७६), बसप (६०-७२), इतर (२-६)
व्हीएमआर : सप+काँग्रेस (१२०), भाजप (२००), बसप (६४)