कुर्मी, कोईरी, निशाद, मल्लाह, मौर्य आदी छोटय़ा, पण महत्त्वाच्या जाती पूर्वाचलच्या केंद्रस्थानी  

उत्तर प्रदेशची निवडणूक जशी अंतिम टप्प्याकडे झुकू लागली, तसा चर्चेचा केंद्रबिंदू यादव, मुस्लीम, दलित यांच्यावरून इतर मागासवर्गीयांमधील (ओबीसी) संख्येने लहान, पण राजकीय प्रभाव मोठय़ा असणाऱ्या जातींकडे वळला आहे. पूर्वाचलमधील सहाव्या व सातव्या टप्प्यामध्ये कुर्मी, मौर्य, मल्लाह, निशाद, राजभर आदी महत्त्वपूर्ण जातींना स्वत:कडे वळविण्यासाठी अहमहमिका लागली आहे. या जातींच्या पाठिंब्यावरच भाजपची मदार असल्याचे मानले जाते.

सोमवारी पाचवा टप्पा पूर्ण झाला आणि आता उरलेल्या दोन टप्प्यांचे (सहावा ४ मार्चला, सातवा टप्पा ८ मार्चला) वेध लागले आहेत. सहाव्या टप्प्यात गोरखपूर, आझमगड, कुशीनगर, देवरिया आदी जिल्हे, तर अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणारा वाराणसी, मिर्झापूर, सोनभद्र, गाझीपूर आदींचा समावेश आहे. बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील या टापूला पूर्वाचल असे म्हटले जाते आणि येथील निवडणूक ओबीसींमधील छोटय़ा छोटय़ा जातींभोवती फिरताना दिसते.

उत्तर प्रदेशात ओबीसींची संख्या ४५ टक्क्यांच्या आसपास मानली जाते. ओबीसींमध्ये यादव शक्तिशाली आहेत; पण सुमारे दोनशेहून अधिक असणाऱ्या छोटय़ा छोटय़ा जातींची संख्या यादवांच्या जवळपास अडीचपट आहे. त्यामध्ये कुर्मी, कोईरी, मौर्य, लोध, राजभर, मल्लाह, निशाद, शाक्य, सैनी आदींचा प्रामुख्याने समावेश होतो. यादवांचे वर्चस्व डाचत असलेल्या या जातींची अस्मिता गोंजारण्याच्या भाजपच्या राजकारणाला भाजप बऱ्यापैकी यश आल्याचे सांगितले जाते. पाच टक्के मते असणारा कुर्मी समाज तर भाजपच्या पाठीशी भरभक्कम असल्याचे चित्र आहे. कुर्मी समाजाचा पक्ष असलेल्या ‘अपना दला’शी भाजपने लोकसभेपासूनच युती केली आहे आणि ‘अपना दल’चे संस्थापक कै. सोनेलाल पटेल यांची कन्या अनुप्रिया पटेल यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री केले आहे. अनुप्रिया या वाराणसीशेजारच्या मिर्झापूरच्या खासदार. जरी आई व बहिणीशी त्यांनी सवतासुभा मांडला असला तरी अपना दलाची मतपेढी अनुप्रियांच्या सोबत असल्याचे जाणवते.

भाजपने अशाच पद्धतीने मौर्य समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा फुलपूरचे खासदार केशव प्रसाद मौर्य यांना प्रदेशाध्यक्ष केले आणि नंतर बसपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे, तर निष्ठावंतांची मोठी नाराजी स्वीकारून मौर्य पिता-पुत्रांना उमेदवारीसुद्धा दिली.  मल्लाह म्हणजे महाराष्ट्रातील कोळी समाजाशी साधम्र्य असलेली जात. सुमारे साडेचार टक्के मते असणारी ही जात नद्यांच्या किनाऱ्यावरील सुमारे ७५ मतदारसंघांमध्ये प्रभावी ठरते. या जातीचे प्रतिनिधिमहत्त्व करणारा कुणी बडा नेता नाही. पण भाजप आणि मायावतीने या समाजाला उमेदवारी वाटपात चांगले स्थान दिल्याचे दिसते.

पूर्वेचे रंग..

  • सुमारे वीस टक्के मुस्लीम, वीस टक्के दलित, उच्चवर्णीय सोळा टक्के आणि ओबीसींमधील यादव नऊ टक्के अशा उत्तर प्रदेशातील ६५ टक्के मतांचा कल जवळपास निश्चित आहे. म्हणून उरलेली ३५ टक्के मते कळीची बनली आहेत. ही मते प्रामुख्याने बिगरयादवी ओबीसींची आहेत.
  • म्हणून तर ओबीसींमधील सतरा जातींचा (कश्यप, केवात, निशाद, राजभर, मल्लाह, धीमार, धीवार आदी) अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय अखिलेश सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतला. पण मामला सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे.
  • वाराणसीच्या आसपास विणकरांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये मुस्लीम व हिंदूदेखील आहेत. हिंदू विणकरांना तांती आणि तंतुवे म्हणतात, तर मुस्लिमांना मोमीन म्हणतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्राने अनेक योजना आखल्या आहेत.