निवडणुकीच्या काळात डावपेच टाकणे, विरोधकांना नामोहरम करणे, वादविवाद, टीका करणे या गोष्टी होताना दिसतात. परंतु एका उमेदवाराने या निवडणुकीसाठी वाट्टेल ते असे म्हणत  परिसीमाच गाठली. चक्क आपल्या भावाची हत्या करुन सहानुभूती मिळवण्याच्या नादात एका उमेदवाराला अटक करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशामधील बुलंदखंड जिल्ह्यात घडली.

राष्ट्रीय लोक दलाचा उमेदवार मनोज गौतम याने आपल्या भावाची आणि आणखी एका नातेवाईकाची हत्या घडवून आणली. या दोघांची हत्या घडवून सहानुभूतीची लाट आपल्याकडे वळविण्याचा मनोजचा डाव होता.
बुलंदशहरजवळील खुर्जा येथे राष्ट्रीय लोक दलाचा उमेदवार मनोज गौतम याचा भाऊ विनोद गौतमचा मृतदेह आढळला. तसेच त्याचा एक नातेवाईक सचिन हा देखील विनोदसोबत आमराईमध्ये मृतावस्थेत आढळला. मंगळवारी झालेल्या जयंत चौधरी यांच्या रॅलीदरम्यान हे दोघे उपस्थित होते. त्यानंतर ते अचानकपणे बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सचिन आणि विनोदचे बंदुकीच्या गोळ्या लागलेले मृतदेह सापडले आणि त्यांच्या हत्येचा तपास सुरू करण्यात आला. कॉल रेकॉर्डच्या आधारे दोन संशयितांना पकडण्यात आले. विनोदचा भाऊ सचिन याच्या सांगण्यावरुनच ही हत्या झाली असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला.

मनोज याच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करुनच विनोदची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. निवडणुकीआधी मनोज गौतमला बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने तिकीट मिळणार होते परंतु ऐनवेळी ते नाकारण्यात आले. त्यामुळे त्याने राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून तिकीट मिळवले. कोट्यवधी रुपये खर्चून आपण ही निवडणूक हरतो की काय अशी भीती मनोजला वाटू लागली होती. त्यामुळे भावाला मारायचे आणि विरोधकांनी भावाची हत्या घडवून आणल्याचा आरोप करायचा असा मनोजचा डाव होता. त्यामधून आपल्याला सहानुभूती मिळेल आणि आपण ही निवडणूक जिंकू असे मनोजला वाटत होते.

मनोजचा ड्रायव्हर प्रविंद्र आणि फिरोज यांच्या मदतीने आपल्या भावाची हत्या घडवून आणण्याचा कट मनोजने रचला. विनोद आणि सचिन या दोघांचे प्रविंद्र आणि फिरोज यांनी अपहरण केले. खुर्जा येथील एका निर्जन आमराईमध्ये नेऊन त्यांची मनोजच्या बंदुकीने हत्या करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक जगदीश शर्मा यांनी म्हटले.

[jwplayer iDKuun7v]