30 May 2020

News Flash

चैत्रगौरी

गुढी पाडवा सरतो आणि वसंत ऋ तूची चाहूल लागताच मला चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचे वेध लागतात.

गुढी पाडवा सरतो आणि वसंत ऋ तूची चाहूल लागताच मला चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचे वेध लागतात. जवळ जवळ २७ वर्षे मी हळदीकुंकू करत होते. वसंतात उकाडा सुरू झाला, तरी जरा मुंबईच्या बाहेर गेले की लालभडक गुलमोहर आणि पिवळाधमक बहावा आपलं लक्ष वेधून घेतात. निसर्गाचं हळदीकुंकूच जणू! मग रेकॉर्डिग नाही, प्रोग्रॅम नाही असा मोकळा दिवस धरून मी हळदीकुंकवाचा बेत आखते.

हळदीकुंकवाच्या आधी दोन-तीन दिवस तयारी सुरू होते. बाजारातून कैऱ्या आणणं, आंब्याच्या डाळीची तयारी करणं, अशी एक ना दोन अनेक कामं! प्रत्यक्ष हळदीकुंकवाच्या दिवशी देवीला चांदीच्या पाळण्यात बसवून तिची छोटीशीच पण ताज्या फुलांची आरास करायला मला मजा येते. निशिगंध, मोगरा, अत्तर, उदबत्त्या, पन्हं, केशर, डाळ या सर्व मिश्र सुगंधांनी समारंभ अगदी रंगतदार बनायला लागतो. हास्यविनोद, खाणंपिणं यात घर रंगून जातं!
अशाच एका हळदीकुंकवाच्या आदल्या दिवशीची गोष्ट. दुपारीच माझ्या मदतीला आलेल्या आई आणि आजीशी गप्पा चालल्या होत्या आणि फोन वाजला. ‘‘उत्तराजी! दुपारी ४ वाजता रेकॉर्डिगला याल का?’’ खरं म्हणजे गप्पांचा फड सोडून रेकॉर्डिगला जायचं जिवावर आलं होतं. पण आई मला म्हणाली, ‘‘अगं, लक्ष्मी आपणहून येते तर तिला अशी लाथाडू नकोस. उद्या आहे ना हळदीकुंकू. आम्ही दोघी तयारी करू ना. जा तू बिनधास्त!’’ शेवटी नाइलाजाने मी रेकॉर्डिगला गेले. मला आठवतं, त्याप्रमाणे अशोक पत्कींचं जाहिरातीचं रेकॉर्डिग होतं ते. रात्री नऊच्या सुमारास अशोकजींनी मला आपल्या गाडीने माझ्या सोसायटीच्या गेटजवळ सोडलं. संथपणे मी आत येत होते. माझ्या बिल्डिंगचा पहिला जिना चढून झाला. दुसरा चढणार तोच, काही कळायच्या आत माझ्यावर एका चोरानं पाठीमागून जोरात झडप घातली. एका हाताने गळा दाबला व दुसऱ्या हाताने माझं तोंड दाबून धरलं आणि अचानक माझं तोंड भिंतीकडे कोपऱ्यात वळवलं. सराईत चोर असावा तो! मंगळसूत्र काढण्यासाठी, त्याने तोंडावरचा हात काढला आणि मंगळसूत्र पाठीमागून तोडलं, पण त्याच्या दुर्दैवाने ते माझ्या साडीत अडकलं. त्याच वेळी, तोंडावरचा हात सुटल्यामुळे मी जोरात ‘चोर, चोर’ ओरडू लागले. माझा आरडाओरडा ऐकून समोरच्या खालच्या फ्लॅटममधील बाई धावत आल्या. चोर बाहेर पळायला लागला आणि त्या बाई चोराच्या मागे! आमच्या गेटच्या बाहेर पडून तो शेजारच्या सोसायटीच्या गेटवर चढायला लागला. त्या धाडसी बाईने, त्याचे पायच घट्ट धरून ठेवले. तेवढय़ात आमचा वॉचमनही आला. दोघांनी मिळून त्याला फरफटत सोसायटीत आणलं. तोपर्यंत सोसायटीला जाग आली होती. तरुण मंडळी खाली उतरली आणि त्या चोराला त्यांनी चांगलंच चोपून काढलं. अचानक घडलेल्या या प्रकाराने मी घाबरून गेले होते. कुणी तरी मला बसायला खुर्ची आणि प्यायला पाणी दिलं. खालची गडबड ऐकून माझ्या घरातली माणसंही धावत बाहेर आली. कोणी तरी पोलीस चौकीत कळवल्यामुळे पोलिसांची गाडीही आली. मग तो चोर, मला वाचवणाऱ्या त्या बाई, मी, माझा नवरा व सोसायटीतील दोन-तीन मुले अशी आमची वरात पोलीस स्टेशनवर. पोलिसांनीसुद्धा त्याला बेदम मार दिला आणि पोलीस कोठडीत ठेवलं.
भेदरलेल्या अवस्थेत मी घरी आले. आई म्हणाली, ‘‘चैत्रगौरीनंच वाचवलं तुला. जर त्याच्या हातात सुरा असता तर काय केलं असतंस तू? मंगळसूत्र तर मिळालं नाहीच त्याला, पण भरपूर मार मात्र मिळाला! हा देवीचाच कृपाकटाक्ष.’’
आईने माझी समजूत घातली खरी, पण इतकी र्वष झाली या गोष्टीला, तरी रात्रीच्या वेळी बिल्डिंगचा जिना चढताना अजूनही नकळत माझी मान पाठीमागे वळते आणि त्या चोराचा तो राकट, शिसारी आणणारा स्पर्श त्या काळ्या रात्रीसह आठवत राहतो..
uttarakelkar63@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 1:06 am

Web Title: chaitra gauri tradition in maharashtrian community
Next Stories
1 धडा
2 लाड
3 दरवळला सुगंध..
Just Now!
X