News Flash

जिम पोरी जिम

जिम सुरू होऊन सुमारे दोन महिने होत आले. अधूनमधून तिच्या मैत्रिणी जिममधल्या प्रगतीची चौकशी करत होत्या.

स्टाफ रूममध्ये गोंधळ सुरू होता. ‘‘वीस मिनिटांच्या रिसेसमध्ये आपली लाडकी मुले-मुली बाहेर कोकाटताहेत. आपण त्यांचे गुरू. घेऊ की थोडे फ्रीडम्.’’ ‘‘चला, आता डबे उघडा.’’ ‘‘पल्लवी मिस्, मी घाईघाईत विसरले टिफिन – डबा घ्यायला. तुमच्या टिफिनमधले टेस्टी फूड ट्राय करते. प्लीज.’’ ‘‘नो प्रॉब्लेम’’ अशी शेरोशायरी एका टेबलापाशी बसलेल्या ग्रुपमध्ये चालू होती. सीनिअर्सचा ग्रुपही डबा खाण्याच्या तयारीत होता. तेवढय़ात कवी प्राध्यापक हातातला डबा सावरत आले. ‘‘ओ रेळे मॅडम, भाजीची अदलाबदल करू या का आपण? बायकोनं भाजी दिलीय प्रेमानं, मला न आवडणारी, भूक अनावर झालीय.’’ रेळे मॅडम सौम्यपणे म्हणाल्या, ‘‘आनंदाने घ्या. पोटभर खा. तृप्त व्हा. भांडण झालेय का प्रज्ञाशी?’’ ‘‘छे हो! माझ्यासारखा साधा, गरीब नवरा तिच्याशी भांडेल का? तुम्हाला कसे वाटले असे??’’ ‘‘राहू द्या.’’ रेळे मॅडमनी आपला भाजी असलेला डबा पुढे केला. अशा कल्लोळात सुरू झाले डबे खाणे. सगळे रंगले होते पोटपूजेत; विद्या मात्र शांत बसून होती. तिच्यासमोर डबा नव्हताच. ‘‘ए प्रभाकर, मला फक्त अर्धा कप चहा दे ना.’’ ती म्हणाली. ‘‘हा मॅडम, आता आणतो,’’ असे म्हणत प्रभाकर घाईने गेला. विद्याने आपल्या बॅगमधून एक छोटा डबा काढला. त्यात दोन मारी बिस्किट्स होती. तिच्या बाजूला बसलेल्या सगळय़ा मैत्रिणी आश्चर्याने तिच्याकडे पाहायाला लागल्या. ‘‘हे गं काय विद्या? फक्त दोन बिस्किटे, ती पण मारीची?’’ विद्याने शांतपणे बिस्किट उचलले आणि ती म्हणाली, ‘‘अगं, मी जिम जॉइन केलेय गेल्या आठवडय़ापासून. तिथल्या डाएट प्लॅनप्रमाणे खावे लागते गं!’’ ‘‘काय आम्हाला न सांगता जिम जॉइन केलेस?? तुला काय गरज आहे गं त्याची? विनोद म्हणाला असेल तिला कर जिम जॉइन म्हणून केलं हिने.’’ बंदुकीच्या गोळय़ांसारखे प्रश्न विद्याने ऐकले- झेलले. तिने खुलासा केला. ‘‘पन्नाशी जवळ आली ना आता माझी आणि तशीही मी फॅटी दिसतेच आहे बरे का. तुम्हाला आठवतेय का, काही महिन्यांपूर्वीच फुल एम्ब्रॉयडरी ड्रेस घेतला होता. आय लाइक इट व्हेरी मच, बट् जाडेपणामुळे मी तो वापरू शकत नाही आजकाल. म्हणून मी अन् नीला- ती सिक्स्थ फ्लोअरवरची, आम्ही दोघी जिममध्ये आधी चौकशी करून आलो. विनोद, सुबोधलाही सांगितला आमच जिम प्लॅन. मगच केले जिम जॉइन.’’ ‘‘धन्य आहात तुम्ही दोघी.’’ मैत्रिणीची नाराजीने प्रतिक्रिया आली. विद्याने उत्साहाने डाएट प्लॅन पेपर त्यांना दाखवला. ‘‘काय आहे गं त्या प्लॅनमध्ये? सांग. आम्ही ऐकतो तरी.’’ ‘‘सकाळी नाश्ता- ओन्ली फ्रुट्स, दुपारचे जेवण – दोन फुलके आणि उकडलेली भाजी, कमीत कमी मीठ असलेली. चहा, कॉफी हळूहळू कमी करून मग बंदच करा, असे आमच्या इन्स्ट्रक्टर पामेलाने सांगितलेय. तिने आम्हाला प्रॉमिस केलेय की, एका महिन्यात मी एकदम स्लिम होईन असे. आठवडय़ातून एक दिवस केळी, कॅबेज ज्यूस, कॅरट ज्यूस कंपलसरी. व्हेरी इंटरेस्टिंग.’’

जिम सुरू होऊन सुमारे दोन महिने होत आले. अधूनमधून तिच्या मैत्रिणी जिममधल्या प्रगतीची चौकशी करत होत्या. कधी कधी त्यांना वाटून जायचं आपणही जिम जॉइन करायला हवे होते. अद्याप फुल एम्ब्रॉयडरीचा ड्रेस विद्याने घातलेला नव्हता. घरचे वातावरणही थोडे डिस्टर्ब झालेले होते. जिमची वेळ होती संध्याकाळी पाच ते सातची. विनोद, सुबोध घरी आले की त्यांना एकटेपणा जाणवायचा. ऑफिसमधल्या गमतीजमती शेअर करायला नीला, विद्या नसायच्या. रात्री जेवताना मग थोडी कुरबुर व्हायला लागली होती. ‘‘फक्त चार महिन्यांचा हा प्लॅन आहे रे. तुम्ही तेवढे आम्हाला समजून घ्या ना.’’ अशी समजूत घालून विद्या नि नीला विनोद, सुबोधला आळवायच्या. जिममधून बाहेर पडले की, सुशांत स्नॅक्स कॉर्नरमधून दरवळणारा सुगंध एक दिवस दोघी मैत्रिणींना वेगळे काही सुचवून गेला. ‘‘दिवसभर डाएट करतो ना आपण? एखादी डिश शेअर करू या का आज? आठवडय़ानंतर प्रत्येकीने एक वेगळी डिश घेऊ असा ठराव झाला. जाता जाता घरीही एखादे पार्सल न्यावे असा विचारही तात्काळ अमलात आला. एके दिवशी सुबोध आणि विनोदने फोनवरून एकमेकांचे अभिनंदन केले. पेपरच्या पहिल्या पानावर त्यांनी सुवार्ता वाचली. ते जिम शहराजवळच्या मोठय़ा कॉम्प्लेक्समध्ये हलवले जाणार आहे. तिथल्या प्रशस्त जागेत नवीन नवीन इंस्ट्रमेंट्स, योगदालनं अशा भरपूर फॅसिलिटीज् होत्या. संध्याकाळी जिममध्ये गेल्या गेल्या दोघी जिम मैत्रिणींना ही बातमी समजली. एका रंगीत पुस्तिकेतली माहिती त्यांनी वाचली. कॉम्प्लेक्समधल्या जिममध्ये आधी ज्यांनी जिम जॉइन केलेय त्यांना खूप डिस्काऊंटही होता. काय करायचे बरे आपण? कंटिन्यू करावे का थांबावे? एकमेकींशी काही न बोलता त्या निघाल्या आणि सुशांत स्नॅक्स कॉर्नरकडे थांबल्या. उत्तर मिळाले होते.
सुनीती पेंडसे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2016 1:08 am

Web Title: getting slim
Next Stories
1 वृक्षमित्र
2 मोहिनीचा भस्मासुर
3 कुठून येतो हा स्वाभिमान?
Just Now!
X