‘पॉलीअ‍ॅमरी’ या विषयावर उत्पल व. बा. यांनी लिहिलेल्या लेखावरून असा विचार आपल्याकडे सूक्ष्म प्रमाणात कुठेतरी सुरू झालेला आहे हे जाणवलं. माणसाचं मन आणि शरीर यांच्या गरजा, व्यक्तिस्वातंत्र्य, पुनरुत्पादनाचं शक्य झालेलं नियंत्रण, जातीपाती-धर्म-प्रांत-देश-भाषा वगैरे जन्माधिष्ठित गोष्टींबद्दलचे किंचित दूर होत जाणारे भ्रम आणि एकूणच जागतिकीकरणामुळे वाढलेलं चलनवलन या सगळ्यांच्या प्रवासात दोन वा अधिक व्यक्तींच्या संबंधांमधले असे बदल आपल्याला भेटत राहणं अपरिहार्य आहे. आणि हे आपल्यासमोर वाढत्या प्रमाणात येणार आहेत. मागेपुढे यांना सामावून घेणारे कायदे अस्तित्वात येतील याबाबत शंका बाळगण्याचं कारण नाही. तूर्त असे होणारे बदल नाकारणं किंवा त्यांचा धिक्कार करणं हे टाळलं तरी पुष्कळ आहे. या गोष्टी त्यात गुंतलेल्या व्यक्तींशी संबंधित आहेत आणि संबंधित व्यक्तींनी असे निर्णय जाणीवपूर्वक घेतल्यावर तत्त्वत: त्यांत काही गैर आहे, असं मानणं चुकीचं आहे एवढं लक्षात आलं तरी पुष्कळ आहे. पॉलीअ‍ॅमरीच्या कल्पनेत अनेक पूर्वअटी आहेत. एक म्हणजे स्त्री-पुरुष ‘व्यक्ती म्हणून’ स्वतंत्रपणे आपले निर्णय घेत आहेत असं यात गृहीत धरलेलं आहे. सामाजिक स्तरावर आजची परिस्थिती याहून खूप दूर आहे. आपल्या आईच्या गर्भातून मुलगी बाहेर येण्याआधी जर तिची हत्या होत असेल तर इथे स्त्रीमुक्ती जवळपास आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. पण समाजातल्या काही थरांत जर स्त्रीच्या मुक्तीचा विचार असेल; पुरुषही आपलं पुरुषीपण ओलांडून पुढे गेले असतील; हे सर्वजण जगण्यासाठी स्वतंत्रपणे सक्षम असतील आणि हे सर्व पचवू शकतील इतके समंजस असतील तर त्यांच्यापुरती ही व्यवस्था अस्तित्वात येऊ  शकते. पॉलीअ‍ॅमरीमध्ये संबंधित व्यक्तींमध्ये आपसात संवाद गृहीत धरला आहे आणि पारदर्शीपणा हा सगळ्याचा गाभा आहे. आणि हे निव्वळ शारीर पातळीवर घडेल, असं मानणं हा मूळ कल्पनेचा विपर्यास आहे.

वैवाहिक असोत की प्रेमसंबंध असोत; त्यांच्या बाहेरची एखादी व्यक्ती मला आवडते; तिच्यावर (सुद्धा) माझं प्रेम आहे याची कबुली देण्याइतपत एकमेकांवर विश्वास असणाऱ्या आणि ते सांगण्याचं धाडस करणाऱ्या व्यक्ती किती असतील? अगदीच दुर्मीळ आणि एकदा अशी कबुली समोर आल्यावर याचा स्वीकार करणाऱ्या संबंधित माणसाच्या मनात आपला /आपली साथीदार आपल्याला सोडून जाईल आणि आपण एकटं पडू याची सतत धास्ती का वाटणार नाही? माणसाजवळ दुसऱ्याला देण्यासाठी प्रेमाचा अमर्याद साठा असतो हे वाक्य (‘इन्फिनिटी’च्या गणिती कल्पनेसारखं) आकर्षक वाटलं तरी माणसाजवळ असलेला वेळेचा मर्यादित साठा विचारात घेतला आणि आपल्या सध्याच्या साथीदाराला जर मूल्यवान वेळ (क्वालिटी टाइम) आपल्याला देता येत नसेल तर नैराश्याचा धोका संभवतो. कारण एखाद्या संबंधाला दिला जाणारा वेळ हे त्या संबंधाबद्दलचं एक महत्त्वाचं मापन असतंच. तेव्हा अशा कल्पना जरी आकर्षक वाटल्या तरी त्यांतल्या व्यवहारांत अनेक खाचखळगे आहेत.

व्यक्तिगत – संबंधांचा विचार करता एकाच वेळी भारतातले काही समूह मनाने वेगवेगळ्या काळात आहेत. कोणी पुराणकाळात, कोणी पंधरा-सोळाव्या शतकात तर कोणी एकविसाव्या शतकात. ही संबंध-विविधता अचाट आहे. मुक्त विचारांचं स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीचे सन्मानाने जगण्याचे अधिकार असे काही निकष वापरल्यावर यांत अन्यायकारक काही नसेल तर या संबंध-विविधतेचं आपण स्वागत करायला हवं.अशोक राजवाडे, मुंबई 

 

उदात्तीकरण धक्कादायक

उत्पल ब.वा. यांचा लेख मन विषण्ण करणारा आहे. लेखकाने पॉलीअ‍ॅमरीचे केलेले उदात्तीकरण अतिशय धक्कादायक आहे. जगामध्ये मोनोगॅमी, पॉलीगॅमीप्रमाणे पॉलीअ‍ॅमरी ही व्यवस्थाही कार्यरत असून त्याची माहिती लोकांना होण्यासाठी केलेली मांडणी स्वीकारार्ह आहे, परंतु तिला प्रोत्साहन देत, व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं याअर्थी ती लग्न व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ असल्याचा केलेला युक्तिवाद मात्र योग्य नाही. पॉलीअ‍ॅमरीला शारीरिक संबंध वज्र्य नाहीत किंबहुना लैंगिक आकर्षण ही स्त्री-पुरुष नात्यातील प्रमुख बाब आहे हे लेखकाला मान्य आहे, त्यामुळे पॉलीअ‍ॅमरीचे वर्णन (बौद्धिक, वैचारिक, भावनिक वगैरे कितीही विशेषणे जोडली तरीही) एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठीची सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर मान्यता असे करावे लागेल.

आपल्याकडील लग्नव्यवस्था (मोनोगॅमीला धरून) ही सामाजिक, नैतिक बांधिलकीच्या माध्यमातून कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कुठलीही व्यवस्था ही परिपूर्ण नसते त्याप्रमाणे लग्नव्यवस्थाही परिपूर्ण नाही. तरीही त्यातील त्रुटींवर मात करण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत. लेखकाला अभिप्रेत असलेल्या प्रगल्भ विचारसरणीची पॉलीअ‍ॅमरी व्यवस्था समाजात रूढ झाल्यास, अथवा त्यास कायदेशीर मान्यता मिळाल्यास एका घरात २-३ बायका, ३-४ पुरुष, ५-६ मुले असे अनाकलनीय चित्र समाजात उभे राहील. नाती, कुटुंब व्यवस्था संपुष्टात येईल. लेखक म्हणतो ‘पॉलीअ‍ॅमरीची संकल्पना माणसातल्या बहुविध ऊर्मीना बहुविध व्यक्तींमार्फत नियमित करण्याचा प्रयत्न करते.’ वास्तविक बहुविध शब्दाला मर्यादा नसल्याने हा तर अनियमित करण्याचा प्रयत्न झाला. प्रस्थापित विचारसरणीला छेद देत, काहीतरी वेगळा विचार मांडणे, वेगळी व्यवस्था राबविणे म्हणजे मनोविकासाचे बरेच टप्पे गाठणे नव्हे. व्यक्ती स्वातंत्र्य अनुभवताना, अनुशासित जीवन जगणे म्हणजे मनोविकास होय. तो पॉलीअ‍ॅमरीचा स्वीकार केल्याने सिद्ध होत नाही. शिवाय वैद्यकीय दृष्टय़ादेखील मोनोगॅमी हीच आरोग्यास सुरक्षित आणि योग्य आहे.

वैयक्तिक विचार मांडणीचा अधिकार सर्वाना असला तरीही तो विचार समाज विघातक असू नये अन्यथा लवकरच ‘ग्रुप सेक्स’, ‘ओपन न्यूडिटी’, ‘भावाबहिणींचं (वेगळं) प्रेम’ यांसारख्या गोष्टी कशा नैसर्गिक असून आजपर्यंत सामाजिक बंधनांमुळे त्यांची गळचेपी करण्यात आली वगैरे आशयाचे लेख वाचनात येतील की, काय अशी धास्ती माझ्यासारख्या वाचकाला वाटते. शेवटी, पॉलीअ‍ॅमरीची गरज आपल्या समाजाला, देशाला नसून, नसलेली गरज निर्माण करण्याची अजिबात गरज नाही. तरीही लेखकाने याचा अधिक गांभीर्याने विचार करावा ही विनंती. संग्राम कोल्हटकर, पुणे

 

नावीन्यपूर्ण लेख

‘पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था’ हा लेख नावीन्यपूर्ण आणि मानसशास्त्रीय संकल्पनांवर आधारित आहे. पुरुषातील समंजसपणा आणि तिसऱ्याला सहन करणे, मत्सर सोडणे, सहजासहजी शक्य नाही, परंतु स्त्रिया हे अधिक सहजतेने सहन करू शकतात, जसे बहुपत्नीत्व.गुलाम समदानी, नांदेड

 

उक्रांतीकडून प्रतिगमनाकडे

‘पॉलीअ‍ॅमरी.’  या लेखात उत्पल व.बा. यांनी ‘लग्नव्यवस्था अस्तित्वात असली तरी ‘मोनोगॅमी’ माणसाच्या आदिम ‘प्रकृती’च्या विरुद्ध असल्याने येथे ‘आदिम प्रकृती’चे अप्रूप का आहे ते स्पष्ट केलेले नाही. ‘आदिम भावनांनी नियंत्रित असलेल्या इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत माणसाच्या मेंदूचे नव-बाह्य़पटल (निओ-कॉर्टेक्स) लंबमज्जे (मेडय़ुल्ला) पेक्षा अधिकच मोठे असते. चिंपान्झीत ते ३० पट असते. माणसामध्ये हे ६० पट. संबंधित केंद्राच्या दर्जातील फरक आणि पेशींमधील जोडण्यांचे व्यापक जाळे यामुळे मानवी आकलनशक्ती विशेष चांगली झाली’ (१), ‘मेंदूच्या नव-बाह्य़पटलाचा विकास झाल्यामुळे लिहिणे, वाचणे, सामाजिक अभिक्रिया-सुसंवाद आणि तात्त्विक चिंतन करता येतात’ (२), ‘जाणीव, भाषा, वर्तणुकीचे आणि भावनांचे नियंत्रण तसेच तदनुभूती (परानुभूती, एम्पथी), दुसऱ्याला उमजून घेणे अशी सामाजिक आकलनाची केंद्रे या नव-बाह्य़पटलात असतात’ (३)‘प्रकृती’च्या प्रेरणांचे अप्रूप असणाऱ्यांनी हे नमूद करावे की माणसात नैसर्गिकच असलेल्या पण दोन परस्परविरुद्ध प्रेरणा कार्यरत असतात.

अ) काम-क्रोध-मोह अशी ‘आदिम प्रेरणा’ आणि ब) नव-बाह्य़पटलाच्या विकासातून आलेली आणि आदिम प्रेरणांना दाबून टाकणारी सामाजिक जाणिवेची ‘नव-प्रेरणा’. आपला ‘डीएनए’ पसरविणे ही आदिम प्रेरणा धुडकावून, स्वेच्छेने निपुत्रिक राहणाऱ्या र. धों. कर्वे दांपत्यासारख्यांना नव-प्रेरणेने प्रभावित झालेला समाज मूर्ख समजत नाही. याच आदिम प्रेरणेच्या प्रभावाखाली सिंह, वाघ असे प्राणी दुसऱ्या नराच्या असाहाय्य पिल्लाची हत्या करतात, पण सावत्र मुलांचे संगोपन करण्यासाठी या आदिम प्रेरणेला ठोकरणाऱ्या पित्यांची, नव-प्रेरणेने प्रभावित झालेला समाज, हेटाळणी करत नाही. स्थल-परिसराचा विचार न करता ‘अ‍ॅज इज अ‍ॅन्ड व्हेअर इज’ पद्धतीने मल-मूत्र विसर्जन करण्याच्या आदिम प्रेरणेला नव-प्रेरणेने प्रभावित झालेला समाज कमस्सल समजतो. ‘लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का?’ ‘नव-बाह्य़पटलाच्या वेगवान आणि लक्षणीय विकासामध्ये दोन घटकांचे योगदान असल्याचे आता मानले जाते. अ) ‘एकपत्नीत्व / एकपतीत्व’ याची (मोनोगॅमी) सामाजिक व्यवस्था असणे आणि ब) मुलांचे संगोपन माता-पित्यांनी करणे, संगोपनात पित्याचा सक्रिय सहभाग असणे. माता-पिता यांच्यातील संबंध सुदृढ आणि दीर्घकालीन असतील तर सामायिक मुले जगण्याचे प्रमाण सुधारते’  हे नमूद व्हावे.

आदिम प्रेरणेला जपायचे की आदिम प्रेरणेवर नियंत्रण ठेवणारी नव-प्रेरणा जोपासायची यामध्ये निवड करण्याची क्षमता नव-प्रेरणेतूनच येते. ती निवड झाल्यानंतर ‘प्रेम एकाच व्यक्तीवर असतं, दुसऱ्याशी ते ‘लफडं असतं’ ही धारणा’ हे चूक की बरोबर याची निवड ओघानेच येते.

‘जाणिवेचं अस्तित्व व स्वरूप मात्र अनुभूतीच्या पातळीवर आहे’ हे बिनबुडाचे आहे. मानवी संवाद हा भौतिकच असतो, अनुभूतीला भौतिकतेच्या पातळीवर आणले की ‘अनुभूती’ असे गूढतेचे वलय नष्ट होते आणि अनुभूतीचे ‘जड’ कारणांपासून वेगळेपण संपते. भौतिकतेच्या पलीकडील ‘समजा’ काही संवेदना/संदेश असतील, तरीसुद्धा त्या उमजण्यासाठी मानवी शरीरात यंत्रणाच नाही. ‘भौतिकतेच्या पलीकडील काहीतरी गवसले’ या जाणिवेसकट, मानवाला होणारी प्रत्येक जाणीव आणि संवेदना पूर्णपणे भौतिक पातळीवर असते. अतिनील किंवा मायक्रोवेव्ह अशा संदेशांचे काहीएक भौतिक यंत्रणेने मानवाला उमजेल अशा स्वरूपात रूपांतर होते तेव्हाच ते मानवाला जाणवतात,

अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघितले की असे दिसते की परदु:ख जाणून घेऊन गाढवाला पाणी देणे, दुसऱ्यासी ‘म्हणे जो आपुलें’ या तत्त्वाचा प्रसार करणे, स्वत:पेक्षा समाजाच्या हिताला प्राधान्य देणे अशी विचारसरणी, उदारमतवादी विचार, (उपरोक्त ३अ), मेंदूच्या नव-बाह्य़पटलाच्या विकासातून आलेली नव-प्रेरणा आहे. ‘चेतापेशींची संख्या आणि बुद्धिमत्ता यात थेट संबंध आहे. यांची संख्या इतर सस्तन प्राण्यांपेक्षा मानवात मोठी आहे. तसेच मानवी मज्जापेशींच्या गुणवत्तेतही वृद्धी झालेली आहे.’ (४). नव-बाह्य़पटलामुळे प्राप्त झालेल्या कौशल्यांचा उपयोग करून निव्वळ स्वत:चे स्वातंत्र्य, मोकाट भांडवलशाही, सामाजिक नियंत्रणाला विरोध, दुसऱ्याची अभिव्यक्ती चिरडून टाकणारी झुंडवादी मनोवृत्ती यांना खतपाणी देत, स्वैराचाराला शास्त्रीय पाया असल्याचे (रॅशनलाझेशन) समर्थन करणे, व्यक्तिकेंद्री आदिम प्रेरणांचा उद्घोष यामुळे, याच नव-बाह्य़पटलातून आलेली, उदारमतवादी नव-प्रेरणा निष्प्रभ होत आहे ही उत्क्रांतीकडून प्रतिगमन (रिग्रेशन) याकडे जाणारी प्रक्रिया चिंताजनक आहे.– राजीव जोशी, नेरळ.

 

लेख आवडला नाही

उत्पल व. बा. यांचा लेख वाचला. त्यात कुठेही बहुपत्नीत्वाचे समर्थन नाही. एका पुरुषाचे अनेक स्त्रियांशी संबंध याचबरोबर एका स्त्रीचे अनेक पुरुषांशी संबंध, तेही कोणाला अंधारात ठेवून नाहीत, हे सांगायचा या लेखाचा उद्देश आहे. पण त्या लेखावर जे चित्र काढले आहे ते पुरुषाचे एकापेक्षा जास्त स्त्रियांशी असलेले संबंध (तेही एकमेकींना अंधारात ठेवून) दाखवणारे वाटते. ते चुकीचे आहे.

मला हा लेख आवडला नाही. याचे कारण भारतीय समाज अजून आपल्या अपत्यांप्रति असलेल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळू शकत नाही. शिवाय लग्न संबंधातही प्रामाणिकपणा नाही. अशा मागासलेल्या समाजाला, अनेक व्यक्तींशी असलेल्या संबंधाबद्दल लेख लिहून वाचायला देण्याची आवश्यकताच नव्हती. मुळात ‘चीनी कम’सारखे चित्रपट वयस्कर पुरुषाचे तरुण मुलीबरोबरचे ‘प्रेम?’ दाखवायचा प्रकार करून आधीच मर्कट असलेल्या भारतीय पुरुषांना फ्लर्टिगसाठी आणखीच उद्युक्त करत आहेत असे मला वाटते.– स्मिता पटवर्धन, सांगली

 

कुटुंब व्यवस्थेला छेद देणारी संकल्पना

‘बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था’ ही संकल्पनाच कुटुंब व्यवस्थेला छेद देणारी आहे. दोन आई, दोन बाबा ही संस्कृती आली तर त्याचा पाल्यांवर काय परिणाम होऊ  शकतो हे विचारात घ्यायला हवे. आजपर्यंत आपण एकपत्नीत्व आणि एकपतीत्व असेच ऐकत आलो आहोत, किंबहुना ते आपल्यावर इतके बिंबवले गेले आहे की बहुविध नात्याची कल्पना पण करवणार नाही. सध्याच्या धावपळीच्या जगात घरातील आहे या व्यक्तींना वेळ देता येत नाही त्यात अजून कोणी आल्यास कसे काय जमू शकेल?

मुले वयात येऊ  लागल्यावर व त्यांची लग्न करायची वेळ आल्यावर वधु/वर संशोधनात अडथळे येऊ  शकतात. या नात्यांच्या बहुपदरी व्यवस्थेत शारीरिक आकर्षण ओघानेच येणार म्हणजे त्याची सर्वतोपरी काळजी बाईलाच घ्यावी लागणार म्हणजे त्यासाठी तिला काही मेडिसीनचा आधार घ्यावा लागणार. या व्यवस्थेला वयाची मर्यादा नाही, असे दिसून येते. त्यातील एखाद्याच्या मृत्यूनंतर सामावून घेतलेल्या व्यक्तीची जबाबदारी घरातील इतरांवर येणार. या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्ता असणाऱ्यांना जरी शक्य असल्या तरी त्यातील धोके विचारात घ्यावयास हवेत. आपले नातेवाईंकाव्यतिरिक्त अनेकांबरोबर प्रेमाचे संबंध असतात म्हणून त्याला/तिला आपण लगेच घरात आणून ठेवणे हे सयुक्तिक नाही. ती व्यक्ती आपल्याखेरीज इतरांनाही आवडत असेल तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ  शकते. आज आपल्या देशात अनेक जाती, धर्माचे लोक रहातात. प्रत्येक जाती धर्मानी पूर्वापार काही चालीरीतींच्या मर्यादा घातलेल्या आहेत, त्याचे उल्लंघन केल्यास समाजाचा रोष ओढवून घ्यावा लागणार. लेखकाच्या म्हणण्यानुसार ही व्यवस्था विचार करण्यासारखी असली तरी आपल्या देशात ती कितपत स्वीकारली जाईल याबद्दल शंका वाटत आहे.क्षमा एरंडे, पुणे