दि. १५ जुलैच्या अंकातील उमेश झिरपे यांचा ‘असे एव्हरेस्टवीर बनू नका’ हा लेख वाचला. आवडला आणि पटलासुद्धा. एव्हरेस्ट गाठणं हे सोपं काम नक्कीच नाही. त्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. राठोड दाम्पत्याच्या एव्हरेस्ट आरोहणावर नेमके काय आणि का आक्षेप घेण्यात आले, हे या लेखातून विस्तृतपणे मांडलं आहे. तसंच एव्हरेस्टवर जाताना कशा प्रकारे तयारी करावी लागते, ते यशस्वीपणे पार केल्यानंतर काय पुरावे सादर करावे लागतात, त्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते अशी सगळी माहिती या लेखातून मिळाली. एव्हरेस्टचे बाजारीकरण कसे झाले आहे यावरही लेखक नजर टाकतो. या संपूर्ण माहितीपर लेखामुळे ज्ञानात भर पडली.
– सदानंद आरेकर, मुंबई.

‘सेलिब्रिटी लेखक’ आवडले!
दि. २४ जूनच्या अंकापासून सुरू झालेला नेहा महाजन यांचा सेलिब्रेटी कॉलम अतिशय उत्तम आहे. त्यांच्या लेखनातील भाषा साधी, सोपी असल्यामुळे जवळची वाटते. त्यांच्या लेखाचे विषयही साधे असतात पण त्यात अनेक विशेष बाबी असतात. ‘सुरांच्यात रमणं’, ‘माझ्या दोन शाळा’, ‘दयाळाची गोष्ट’ हे सगळेच लेख आवडले. दोन वेगवेगळ्या वातावरणातील शाळांमध्ये शिकून दोन्हीकडील शालेय संस्कृती त्यांनी आत्मसात केल्याचं ‘माझ्या दोन शाळा’ या लेखामुळे दिसून आलं. एक जुलैच्या अंकातील अरुंधती जोशी यांचा ‘समानतेतला विरोधाभास’ हा लेखही आवडला. वटपौर्णिमेवर विनोदी, मार्मिक, संवेदनशील भाष्य होत असतानाच स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा उपस्थित करून त्यातला विरोधाभास दाखवणं, हे पटलं. ‘समानतेतला विरोधाभास’ या लेखात मांडलेले मुद्दे पटले. स्त्री-पुरुष समानता या विषयावर अनेकदा चर्चा होत असते. पण, त्यातही विरोधाभास कसा आहे हे हा लेख सांगतो.
– शुभांगी सरोदे, पुणे.

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
ai technology marathi crime news
“मी इन्स्पेक्टर विजयकुमार बोलतोय..”, AI चा वापर करून ५८ वर्षीय महिला प्राध्यापिकेची फसवणूक; १ लाखांचा गंडा!

खारीचा वाटा
‘लोकप्रभा’ ३ जूनच्या अंकातील ‘वृक्षोपनिषद’ हा आचार्य वसंत गोडबोले यांचा लेख वाचला. वृक्षारोपण व संवर्धनाची महती आणि वृक्षराजींची यथासांग माहितीमुळे उद्बोधक वाटला.

या लेखावरून, मी काम करत असलेल्या खासगी आस्थापनेतील कार्यकारी संचालकांनी दाखवलेल्या, राष्ट्रपतीपदक दिल्या गेलेल्या एकांडय़ा शिलेदाराची ध्वनिचित्रफीत खूपच प्रभावित करणारी होती, ती आठवली. जोरहाट, आसाम येथील जादव पायेंग या माणसानं ब्रह्मपुत्राकाठावरच्या जवळच्या बेटावर एक हजार २५० एकरांत १९७९ सालापासून वृक्षलागवड केलेली आहे. पुराच्या तांडवातून होणारं नुकसान टाळलं आहे. ते चांगलं अभयारण्य बनलं आहे.

यावरून प्रेरणा घेऊन आमच्या संचालकांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी एक चांगला उपक्रम राबवला आहे. आपल्या मुलांच्या वाढदिवशी त्यांच्या सहकारी गृहसंस्थेत आणि कचेरीत येण्या-जाण्याच्या मार्गावरील रस्त्याकडेला योग्य जागा पाहून एक एक झाड लावण्याचा संकल्प ते पाळत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मुलांकरवी त्यांना नियमित पाणीही ते देतात. तीन-चार वष्रे वयाची ती मुलेही न सांगता, पाणी घालतात.

गेल्या महिला दिनी ८ मार्च २०१६ रोजी आमच्या कचेरीत दोन तासांच्या स्पर्धा-खेळांचं त्यांनी आयोजन केलं होतं. त्या वेळी सगळ्यांना सहभागाबद्दल मोगऱ्याची रोपं बक्षीस म्हणून दिली गेली. नंतर ती स्वत:च्या घरी लावून त्याची स्वत:बरोबरची छबी मोबाइलवर पाठवण्यास सांगितली.

यावरून पर्यावरणावर केवळ चर्चा न करता स्वत: खारीचा वाटा उचलण्याची नागरिकांची तयारी असते, हे लक्षात येतं. स्थानिक प्रशासनानं अशा गोष्टींसाठी त्यांना प्रोत्साहन देणं आणि देखभालीच्या सातत्यासाठी तयारी दाखवणं आवश्यक आहे, असं वाटतं.
– श्रीपाद कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.

डाळींच्या बाजारपेठेत
तुरीच्या डाळींचे भाव गेल्या वर्षी एकदम गगनाला भिडले. त्याच सुमारास टीव्हीवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये या भाववाढीसंदर्भात चर्चा होती. त्या कार्यक्रमात भाववाढीची कार्यपद्धती सांगितली. त्या मोडस ऑपरेंडीनुसार देशात पिकणाऱ्या पिकाचा व भाववाढीचा काहीही संबंध नसतो, असा चर्चेचा निष्कर्ष होता. भाव वाढवायचे किंवा नाही, कोणत्या गोष्टीचे- उत्पन्नाचे भाव किती वाढवायचे हे सर्वसाधारण जून-जुलैमध्येच ठरते. प्रत्येक वस्तूचे (कमोडिटी) चे व्यापारी त्या कमोडिटीतील अग्रेसर व्यापाऱ्यांची एक कमिटी नेमतात व ती कमिटी हे सर्व ठरवत असते. या वर्षी वेगवेगळ्या वस्तूंची उपलब्धता खोटीच कमी करून कृत्रिम टंचाई करून भाव भरमसाट वाढवले जातात. सामान्य नागरिकांना अक्षरश: लुटले जाते. सगळीकडे बोंबाबोंब होऊन सरकार काही पावले उचलेपर्यंत या व्यापाऱ्यांनी अपेक्षित नफा कमावलेला असतो.

या व्यवहारात अग्रेसर असणाऱ्या दिल्लीतील दोन व्यापाऱ्यांची नावे, त्यांचे फोटोही दाखवण्यात आले होते. आपल्या अंकात किंवा राऊत मॅडमच्या लेखात त्याचा साधा उल्लेखही नाही, त्यामुळे थोडी निराशा झाली.
– उषा परांजपे, नौपाडा, ठाणे.

‘नांदा सौख्य भरे’ हेच महत्त्वाचं
‘लोकप्रभा’च्या १० जूनच्या अंकातील चैताली जोशींचा ‘कमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी’ हा लेख उत्तम आहे आणि आजच्या घटस्फोटोत्सुक तरुण-तरुणींच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे यात शंकाच नाही.

खरोखरच घटस्फोटांचे वाढते प्रमाण ही काळजीत टाकणारी समस्या आहे. सध्या आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह, ऑनलाइन विवाह, लग्नानंतरची अर्निबध राहणी, लग्नापूर्वीच गर्भपात इत्यादींचा सुळसुळाट झाला आहे. त्यातही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट, या प्रकारांमुळे समस्या अधिक जटिल व गंभीर होते आहे. अपत्यांची संख्या आता एकवर आल्याने तो किंवा ती अत्यंत लाडात वाढलेले असते.

जुळवलेल्या लग्नाच्या बाबतीत न पटणं आपण समजू शकतो, पण प्रेमविवाहाच्या बाबतीत होणारे घटस्फोट म्हणजे न उलगडणारे कोडेच आहे.  नवरा-बायकोचे भांडण, वादविवाद हे फार काळापासून चालत आले आहेत. तरीपण जुने विवाह (अरेंज) वर्षांनुवर्षे टिकले आहेत. कारण त्यात प्रेम, कर्तव्य, काळजी, सेवाभाव याला जास्त महत्त्व होते. संसार टिकवण्याकरिता एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असावी लागते. तडजोड आणि त्याग असं दोन्ही हवं. ती आजच्या पिढीत फारच कमी प्रमाणात दिसून येते.

तरुण वयात कमावत्या दिवसात वा रागाच्या भरात घटस्फोट घेणे सोपे आहे. पण थोडं वय झाल्यावर, माता-पित्याचा आश्रय नाहीसा झाल्यावरची परिस्थिती भयावह असते. मानसिक तणाव आणि एकटेपणा यावर कुठलाच उपाय सापडत नाही. म्हणून आपला संसार स्थिर व सुखी कसा राहील याचा संपूर्ण विचार करूनच लग्न करावे. मग ते अरेंज असो किंवा लव्ह मॅरेज असो.

‘नांदा सौख्य भरे’ हाच उद्देश समोर ठेवला तर सर्वच अडचणींना व गैरसमजांना तोंड देऊन जीवन आनंददायी होईल हे निश्चित.
– भाऊराव हेडाऊ, नागपूर.

कुणाचा तर हात…
‘लोकप्रभा’च्या ८ जुलैच्या अंकातील ‘ग्लॅमरस मुखवटय़ामागे ड्रग्जची ममता’ ही कव्हर स्टोरी मन सुन्न करणारी वाटली. एका नवीन विषयाला वाचा फोडल्याबद्द्ल आभार. यानिमित्ताने मला एक प्रश्न पडला आहे. या सर्व प्रकरणांमागे एखाद्या सरकारी अधिकारी व्यक्तीचा हात असल्याशिवाय हे कसे काय घडू शकते?  मोठय़ा प्रमाणावर अशा प्रकरणावर आघाडी मोहीम का उघडली जात नाही?
– वैभव बारटक्के (ईमेलवरून)

युथफुल आवडते!
‘लोकप्रभा’त या विभागातील सर्वच लेख तरुणाईच्या आयुष्याशी निगडित असतात. अ‍ॅडवाट, स्टार्ट अप, तरुण वल्ली, फॅशन फंडा, विविधा असे सदर वाचनीय होते. पण, त्यात खंड पडला आहे. तरुणांच्या आयुष्यात काय सुरू आहे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांच्यातील नवे ट्रेण्ड, कॉलेजचे विविध उपक्रम या सगळ्यांबाबत त्यात माहिती मिळायची. ती तशीच मिळत राहो!
– सायली देवळेकर, मुलुंड.

मनोहर मांदाडकर आणि म. ल. वराडपांडे यांचे माहितीपूर्ण लेख आवडले.
– श्रीकांत पवनीकर.