‘लोकप्रभा’ दि. १५ जुलै २०१६ मधील सुहास जोशी व डॉ. अभय टिळक यांची ‘सातवा वेतन आयोग मध्यमवर्गीय मात्र महागाईच्या तोंडी’ ही कव्हर स्टोरी वाचली. महागाईची संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते आणि मागणी-पुरवठा यावर अवलंबून असते हे सर्वानाच माहीत आहे. उदा. सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी भरपूर पगार मिळवून पैसे हातात खेळवून असतो. त्यामुळे पडेल त्या किमतीला कुठलीही गोष्ट, जीवनावश्यक असो वा नसो, पदरी पाडून घेण्याची त्याची वृत्ती असते. जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीकडे वा पेट्रोल-डिझेल भावात झालेल्या चढ-उताराकडे लक्ष देण्यात वाया घालवायला त्याच्याकडे वेळ नसतो. बाजारपेठ अशा लोकांची होत चालली आहे.

सरकारी कर्मचारी वेतन आयोगाच्या कृपेनं वेतन सुरक्षित, नोकरी शाश्वती यामुळे आपल्याच तोऱ्यात असतात आणि त्यांचीही क्रयशक्ती आय.टी. कर्मचाऱ्यांसारखी असू शकते. दोहोंच्यात फरक आहे तो सेवाभावाच्या मानसिकतेत. आय.टी. कर्मचाऱ्यांची संघटना नसते आणि त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरच त्यांची वेतनवृद्धी आणि त्यांचं नोकरीत टिकणं अवलंबून असते.

सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र संघटना बांधता येते आणि प्रशासनाला प्रसंगी वेठीस धरता येतं. पण कामाच्या बाबतीत वेळेचं बंधन, कामाच्या गुणवत्तेचं मोजमाप, जबाबदारीची जाणीव यांवर कुणाचा अंकुश नको असतो. त्यांच्याबाबतीत कामातल्या गुणवत्तेचं मोजमाप करण्याची स्वतंत्र प्रणाली आणि त्यातून तावूनसुलाखून निघण्याची प्रत्येकाला सक्ती, अन्यथा संघटनेतून बेदखल करण्याची ताकीद आणि बेफिकिरीची वारंवारता वाढल्यास कामावरून कमी करण्याची शासनाला शिफारस या गोष्टी अमलात आणल्या पाहिजेत असं वाटतं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेतनवाढ जाहीर करताना सरकारनंही, वेतन आयोगाचं काम चालू असताना अन् अर्थसंकल्प मांडताना जी आर्थिक स्थिती होती, त्यात झालेल्या प्रमुख स्थित्यंतरांचा अभ्यास करणारी पारदर्शी यंत्रणा उभारून, वेतनवाढ जाहीर करण्याआधी सरकारी कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन त्याची व दूरगामी परिणामांची कल्पना दिली पाहिजे आणि त्यानुसार सारासार विचार करण्याची सवय लावली पाहिजे आणि वेतन आयोगाच्या शिफारशींचा फेरविचार करण्याची मुभा घेतली पाहिजे.
– श्रीपाद कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.

हेच आजचं समाजवास्तव
दि. १० जूनच्या ‘लोकप्रभा’मध्ये ‘कमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी’, कव्हर स्टोरी वाचल्यावर या दिवसांमध्ये टी. व्ही.वर येणाऱ्या गोरेपणाची क्रीमची जाहिरात प्रकर्षांने आठविली. त्यांत मुलगी वडिलांना समजाविते- ‘‘तीन र्वष लागतील त्याच्यासारखा जॉब, वेल हाउस, वेल सेटल लाइफपर्यंत पोहोचायला तेव्हाच तर होईल नं वन. इक्वल – इक्वल’’. हे अगदी खरंच चित्र आहे आजच्या समाजजीवनाचं. मागील पिढय़ांमध्ये शिकलेली सून- पत्नी सर्वानाच हवी असायची ती जास्त पैसा घरात येईल म्हणून. आता जर ही पिढी अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत आहे ती साहसी झाली आहे तर पुरुषांनादेखील इगो सोडावा लागेल अन्यथा घटस्फोटाला सामोरं जावं लागेल हे निर्विवाद सत्य ओळखायलाच हवं. तसंच १७ जूनच्या ‘लोकप्रभा’मध्ये ‘एकवीरेच्या डोंगरात थर्माकोलची नदी, छत्रपतींच्या राजगडला प्लास्टिकचा वेढा’, ही कव्हर स्टोरी वाचली. प्लास्टिकचा  भस्मासुर आपणच निर्माण केला आहे. आता त्याचा नायनाट लावायला आपणच कंबर कसायला हवी.
– संध्या बायवार, बानपुरा, जि. होशंगाबाद.

कायमस्वरूपी तोडगा तातडीने हवा!
दि. १ जुलैच्या कव्हर स्टोरीसाठी, मुंबई-महाराष्ट्र ते जागतिक पातळीवर विविध दुष्परिणाम करणारा अमली पदार्थाचा विषय निवडला तो यथोचित व सद्य:स्थितीत ‘उडता पंजाब’निमित्ताने सर्वाधिक चर्चिला गेलेला होता. अमली पदार्थाच्या दूरगामी प्रभावाने तरुणाई ग्रासत चालली आहे. जुन्या प्रस्थापित अमली पदार्थाबरोबरच नवनव्या पदार्थाच्या जाळ्यात घेणारे अडकत आहेत. याबाबत कुटुंब, समाज जागरूक नाही. नवश्रीमंत झालेले या मोहाच्या विळख्यात अडकत आहेत. रेव्ह पाटर्य़ावर क्वचितच धाडी घातल्यानंतर शासन ढिम्म राहाते, ही दुर्दैवी बाब आहे. आपल्या संपादकीयात याबाबत आपण पुरेसा इशारा (महाराष्ट्र पंजाबच्याही पुढे) दिल्याबद्दल आभार!
 – अजित पालये, बदलापूर

‘वाढते अमली पदार्थ सेवन घातक’
दि. ८ जुलच्या लोकप्रभामधील ‘उडता महाराष्ट्र’ हे मथितार्थ वाचले. अमली पदार्थाच्या सेवनाने मृत्युमुखी पडणारे खूप आहेत व हे प्रमाण वाढतच आहे, हे वाचून महाराष्ट्र कुठे जात आहे हे समजले. अमली पदार्थावर सरकारने र्निबध लादायलाच हवेत. तसेच आई, वडील व पालक यांनीही पाल्याबाबत जागरूकता ठेवावी व अमली पदार्थापासून युवा पिढी वाचवायला हवी.

‘नीट फक्त टय़ूूशन उद्योग सुरू राहण्यासाठी’ हा साप्ताहिक ‘लोकप्रभा’ (१० जून) मधील ‘नीट’च्या निमित्ताने आलेला लेख वाचला. ते तसेच असणार असे वाटते, कारण खासगी क्लास म्हणजे पशांची चांदी होय. म्हणूनच खासगी क्लासवर नियंत्रण ठेवणे हे सरकारचेच काम आहे. टय़ूशनचे वाढते पेव नियंत्रित करणे गरजेचे आहे.
– धोंडिरामसिंह राजपूत, वैजापूर, जि औरंगाबाद.

युग आणि रामायण
डॅन ब्राऊन वाचून मीही या निष्कर्षांपर्यंत आलो आहे की पूर्वी उल्लेख असलेली युग ही संकल्पना वर्षांशी नव्हे तर दिवसांशी संबंधित असावी. पूर्वी युग हे दिवसांमध्ये मोजले जात असावे. पण हेच सूत्र वापरलं तर रामायणाचा कालखंड काय असू शकतो, असा मला पडलेला एक प्रश्न आहे.
– अमजद पारकर, ई-मेलवरून.

चुकीची माहिती
‘लोकप्रभा’तील ‘कलियुगाची समाप्ती’ या लेखात बरीच चुकीची माहिती होती तरीही मी तो वाचला. महाभारत तसेच व्यासकाळात म्हणजेच प्राचीन काळच्या ‘सूर्यसिद्धांता’ नुसार कृतयुगाच्या समाप्तीनंतर कलियुगाचा कालावधी दिला आहे. आर्यभट्टाने या सिद्धांतावर आधारित ‘आर्यभट्टीय’ सूत्रांमध्ये हा काळ ख्रिस्तोत्तर ५०० र्वष असा धरला आहे. सहाव्या शतकात वराहमिहिराने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतरच्या काळात ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट दुसरे तसेच आणखीही काही लेखकांनी या काळावरच शिक्कामोर्तब केले. नंतर ११७७ मध्ये भास्कराचार्य दुसरे यांनी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात त्यांचे विद्वत्तापूर्ण विवेचन केले. त्यावर डॉ. जयंत नारळीकर यांनीही ‘अद्वैत भास्कराचार्य’ असा गौरव करून एका लेखात मांडले आहे की, ११७७ मध्ये भास्कराचार्य दुसरे यांनी मांडलेली समीकरणे २०१२ पर्यंत ऑक्सफर्ड आणि केंब्रिजमधल्या गणितींनाही सोडवता आली नव्हती. त्यामुळे ‘कलियुगाची समाप्ती’ हा लेख फारसे संशोधन न करता लिहिलेला आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे. युग संकल्पनेतील वर्षे जास्त आहेत म्हणून ती चुकीची आहेत, असे समजण्याचे कारण नाही. याचा पुराणांशी काहीही संबंध नाही. यात व्यास, महाभारत, शालिवाहन यांचाही संबंध नाही.
– रमेश पंचवाघ, ई-मेलवरून

भाकड भविष्यवाणी
‘इ.स. ६६६६मध्ये कलियुगाची समाप्ती?’ या लेखाचे (८ जुल)  वर्णन फक्त एका सौम्य शब्दात करावयाचे झाल्यास ‘हास्यास्पद’ हा शब्द चपखलपणे वापरता येईल. एका पोथीवर विसंबून केलेल्या भाकड भविष्यवाणीवर विश्वास ठेवणे अवघड आहे. लेखाच्या अध्र्या भागात कलियुगाचा एकूण कालावधी ४,३२,००० वष्रे नसून फक्त १४०० वष्रे एवढाच आहे हे सांगण्यात आले व त्यानंतर कुठल्या तरी पोथीचा आधार घेऊन ही संख्या ९७६८ वष्रे एवढी आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. यातील खरा आकडा कोणता? गमतीचा भाग म्हणजे इ.स. ६६६६ साली ही भविष्यवाणी खरी ठरेल की खोटी हे पडताळून पाहण्यासाठी आपल्यापकी कोणीच हजर असणार नाही. मग ६६६६ ऐवजी ५६६६ किंवा ७६६६ म्हटले तरी त्याने काय फरक पडणार आहे? लेखासोबत सिंधू सभ्यतेची छायाचित्रे छापून यातील मजकुराला काही तरी ऐतिहासिक मूल्य आहे असे भासवण्यात आले आहे. सिंधू सभ्यता व कलियुगाची संकल्पना यांचा काय संबंध आहे? विज्ञाननिष्ठेचे व्रत घेतलेल्या ‘लोकप्रभा’ने अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे लेख प्रसिद्ध करून असल्या प्रवृत्तींना प्रोत्साहन देऊ नये, ही माफक अपेक्षा.
–  प्रमोद पाटील, नाशिक

प्रमोशनच्या अतिरेकाचा ‘पंचनामा’ उत्तम!
दि. ८ जुलैच्या अंकातील टीव्हीचा पंचनामा वाचला. अति प्रमोशनची शिसारी येते. वर्तमानपत्रे आणि सोशल माध्यमांमध्ये जाहिरात करूनही पुन्हा छोटय़ा पडद्यावर सिनेमा/नाटकवाले हजर होतात. ‘द कपिल शर्मा शो’, ‘चला हवा येऊ द्या’ हे खास प्रमोशनसाठी निर्माण झालेले कार्यक्रम आहेत. स्त्री वेशातील पुरुषी पात्रे, अंगविक्षेप, व्यंगावर बोट ठेवणारे पाणचट विनोद याचा आता साचा बनल्यामुळे विरंगुळा न होता त्या प्रमोशनचा उबग येतो. पूर्वीच्या काही लोकप्रिय आणि उत्तम चित्रपटांचे कुठे प्रमोशन झाले होते? पदार्थ रुचकर करण्यासाठी फोडणीचे महत्त्व आहे, तेवढेच प्रमोशनचे ठेवावे!
– केदार पालये, बदलापूर