15 August 2020

News Flash

तरुण मुलामुलींना वेळीच सावरायला हवे

वडील व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले घडत असतात. अशा समयी त्यांचीही काही कर्तव्ये आहेत.

‘म्याँव, म्याँव’चे टार्गेट तरुणाई (सा. लोकप्रभा २३ डिसेंबर) मुखपृष्ठाचा आढावा घेणारा हा लेख, तरुणाईला आपल्या विळख्यात घेणारा व आता शालेय विद्यार्थ्यांनाही आपल्या विळख्यात घेऊ पाहणारा हा लेख माता-पिता व पालकांना सावध करणारा आहे.

शालेय वयातील मुले अनुकरणप्रिय असतात. आपले मोठे भाऊ जे करतात, ते आपण करायला काय हरकत आहे, असे त्यांचे मन त्यांना वारंवार बजावते आणि मग ज्येष्ठांचे अनुकरण सुरू होते. याशिवाय प्रस्तुत लेखांत  डॉ. शिल्पा अडारकर यांनी पौगंडावस्थेतील मुलांच्या अमली पदार्थ सेवनाच्या तीन कारणांचा उल्लेख केला आहे. हे जरी खरे असले तरी आई, वडील व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले घडत असतात. अशा समयी त्यांचीही काही कर्तव्ये आहेत. आई, वडील व शिक्षक यांनी आपल्या पाल्याच्या सवयी, आवडीनिवडी व वर्तणुकीत झालेले बदल तात्काळ ओळखून त्याबाबत वेळीच सावधगिरी बाळगून मुलांमुलींना वरील अमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावून सांगितले तर शालेय मुले-मुली व मोठी मुले-मुलीही या व्यसन व विकारापासून सहज परावृत्त होऊ शकतात. मुलामुलींनीही या प्रवाहात न वाहता ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.’ याचा विचार करून स्वत:च्या भविष्याबाबत जागृत राहण्याची गरज आहे.

धोंडीरामसिंह राजपूत औरंगाबाद

थांबवा आता कांगावा

अलीकडे ३-४ लोकप्रभा नोटाबंदीसंबंधीच होते. या निर्णयाचे सर्वसामान्यपणे समर्थन होत असले तरी विरोधी पक्ष मात्र निर्माण झालेल्या अडचणींचे भांडवल करून ओरड करीत आहे. लोकसभा -राज्यसभा चालू दिली नाही. लोकांना रांगा लावाव्या लागल्या कबूल आहे. काही प्रमाणात आर्थिक व्यवहार थंडावले, पण एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानात घ्यावी की २॥ – ३ महिने अशांत असलेले काश्मीर त्वरित शांत झाले. दगडफेक-जाळपोळ बंद झाली. पर्यटन हळूहळू सुरक्षित होत आहे. हा अप्रत्यक्ष परिणाम नाही का? आणि प्रश्न रांगेत उभा राहण्याचा, तर या आधी पण जनेतेने रॉकेलसाठी, गॅस सिलेंडरसाठी, रेशनसाठी, रेल्वे स्टेशनवर, बस स्टेशनवर, सिनेमाच्या तिकिटासाठी, पंढरपूर, शिर्डी, बालाजी आदी  धार्मिक क्षेत्रावर तासन्तास रांगा लावल्याच आहेत. म्हणजे भारतीय जनतेसाठी हे काही फार नवीन नाही. शिवाय सामान्य माणूस नोटाबंदी निर्णयाविरोधात नाही. तेव्हा आता मूठभर लोकांनी आपला कांगावा थांबवावा.

– डॉ. अनिल सोहोनी, दोंडाईचा (धुळे)

नोटाबंदीचे खरे ठरलेले भाकित

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नरेंद्र मोदींनी रु. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्याने उद्भवलेल्या आर्थिक नाणेटंचाईनंतर जेव्हा मी आपल्या साप्ताहिक ‘लोकप्रभा’चा वार्षिक भविष्याचा २०१६ चा जानेवारीचा विशेषांक काढून पाहिला तेव्हा माझ्या आश्चर्यास पारावर राहिला नाही. आनंद जोहरी यांनी  याबाबत ‘‘पैसा बाजारातून जणू काही नाहीसा होईल. समाजातला अभिजित आणि समृद्ध असलेला वर्ग अनेक गोष्टीमुळे त्रासलेला असेल. पैशाच्या कमतरतेने शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी बिकट होतील. पैशाच्या अभावाने व्यापारी हवालदिल होतील. पैशाअभावी बडे लोकही संकटात येतील’’ असे लिहिले होते.

हे सर्व आजच्या घडीला सूर्यप्रकाशाइतके लख्ख दिसून येत आहे. आनंद जोहरी यांच्या  या भविष्यकथनाबाबत त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

– ग. के. शिंदे, कोल्हापूर

‘अम्मां’ना भावपूर्ण श्रद्धांजली

९ डिसेंबर २०१६ चा ‘लोकप्रभा’ मथितार्थ ‘सर्वाची नजर २०१९’ वर आवडले.

‘अम्माच्या अनुपस्थितीत हा ‘प्रवाह’ या सदरांतर्गत हृषीकेश देशपांडे’ ह्यंचा लेख वाचला. तो अंक प्रकाशित होऊन वाचकांच्या हाती येईपर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री सुश्री जयललिता ऊर्फ ‘अम्मा’ चे निधन झाले. एका सुंदर सिनेतारकेचा जीवनप्रवाह तसा तर खडतर मार्गाचा असतो व तिचा शेवटही अनेकदा दयनीय अवस्थेत झालेला वाचण्यात आलेले असते. पण जयललितांच्या बाबतीत वेगळेच घडले. एकटय़ा असूनही सगळ्यांच्या होऊन त्या या जगातून गेल्या. त्यांनी ६ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद गाजवले. गरिबांच्या खरोखरीच अम्मा झाल्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तामिळनाडू राज्यात त्यांची राजनैतिक पोकळी भरावयास दुसरी जयललिता मिळणं कठीण.

‘‘चैताली जोशी’ यांची ‘कव्हर स्टोरी’ पावसानं तारलं ‘कैश’लेसने मारलं वाचली. ती मार्मिक तर आहेच. अचानक झालेल्या नोटाबंदीने मात्र गरीब शेतकऱ्यावर आभाळ कोसळलं. आजही अति मागास ग्रामीण भारतांत बँकाच नाहीत तर कसला डिजिटल मनी आणि कसले एटीएम-पेटीएम? दर खेपेला मारला जातो तो मात्र शेतकरीच.

 संध्या बायवार बानापुरा, मध्यप्रदेश

ओढूनताणून सेलेब्रिटी

‘लोकप्रभा’चे सगळे अंक मी नियमित वाचते. मला एकच गोष्ट नेहमी खटकते, ती म्हणजे प्रत्येक विशेषांकात सेलेब्रिटी लोकांना ओढूनताणून आणले जाते. काही लोकांना सेलेब्रिटींचं सगळं वाचायला आवडतं म्हणून सगळ्या लोकांना सारखं सेलेब्रिटीचं सगळं का वाचायला लावता? त्यांनाही सुखाने जगू द्या आणि आम्हाला आमचा आवडता ‘लोकप्रभा’ सुखाने वाचू द्या.

आशालता जंगम, नाशिक.

आव्हान ३८० चे नाही ४८० चे

प्रसाद लाड यांचा नवत्रिशतकवीर हा लेख वाचला. लेख वाचनीय होता. या लेखात इराणी ट्रॉफीचा उल्लेख करण्यात आला आहे. या सामन्यात मुंबईने शेष भारतापुढे ३८० धावांचे आव्हान ठेवले होते, असे लेखात लिहिले आहे, पण प्रत्यक्षात हे लक्ष्य ४८० धावांचे होते.

तुषार शेडगे, ई-मेलवरून

भविष्य विशेषांकाची गरजच काय?

‘लोकप्रभा’ हे कायम भविष्यवेधी विचारांना वाव देणारे साप्ताहिक आहे. अनेक नावीन्यपूर्ण विषय आपण नियमितपणे हाताळत असता. पण एकीकडे असे विषय हाताळताना दुसरीकडे मात्र एक संपूर्ण अंक भविष्याला वाहिलेला असतो. ही बाजारपेठीय शरणता आहे का?

– अनिकेत जोशी, पुणे, ई-मेलवरून

स्मार्ट कुकिंग आवडले

वर्षभर सुरू असणारे स्मार्ट कुकिंग हे विवेक ताम्हाणे आणि सीमा नाईक यांचे सदर आवडले. मायक्रोवेव्ह आणि इतर अनेक रेसिपीजचा आनंद घेता आला. मायक्रोवेव्हचा वापर करून आम्हा पुरुषांनादेखील अनेक पदार्थ तयार करता आले. पुढील वर्षांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

– अक्षय जगदाळे, अमरावती

‘आसमंतातून’ हे रुपाली पारखे-देशिंगकर यांचे सदर अप्रतिम होते. त्यांनी सर्व लेख संकलित करून एक पुस्तक काढावे.

– वर्षां सिद्देवाडकर, ई-मेलवरून

रायबांना भेटायला आवडले असते..

२३ डिसेंबरच्या अंकातील श्रीराम खाडिलकर यांच्या ‘ब्रॅण्डिंग न झालेला ब्रॅण्ड’ हा लेख मनाला भिडला. मी ४० वर्षे हैदराबाद येथे उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राची प्राध्यापिका होते. त्यामुळे सर्व पातळींवरील मुस्लीम समाजाला जवळून पाहिले व रायबांसारख्या अनेक साध्या सरळ माणसांशीदेखील जवळून परिचय झाला. रायबांसारख्या मेहनती कलाकाराची ओळख वाचून समाधान वाटले. फक्त हा लेख एक वर्ष आधी वाचायला मिळाला असता तर त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता.

मी तक्रार करणार होते की आपला अंक फक्त तरुणांसाठीच असल्यासारखा म्हणजे दागिने, कपडे, शॉपिंग, फॅशन वगैरेसंबंधीची माहिती जास्त देतो व आमच्यासारख्या ज्येष्ठांना गुंडाळून ठेवल्यासारखं वाटायचं. पण ६ जानेवारीच्या अंकातील ‘एकटा’ ही गोष्ट वाचताना डोळ्यांतून पाणी आले, आपल्याच जवळचे वाटले. या कथेबद्दल ऊर्मिला परांजपे यांचे अभिनंदन!

– डॉ. शालिनी भोगले, बंगळुरू, ई-मेलवरून

पडद्यावरची खाबूगिरी आवडली

रेसिपी म्हटलं की महिला असं समीकरण असते. पण हॉटेल्स किंवा जेथे मोठा भटारखाना असतो तेथे पुरुषांचाच वावर असायचा. पण टीव्हीवरील कुकरी शोजने ही समीकरणं बरीच बदलली. हा बदल बराच जुना आहे. पण त्याची दखल पराग फाटक यांनी खूप चांगल्या अंगाने घेतली आहे.

– संजय भोसले, औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 1:01 am

Web Title: readers response 135
Next Stories
1 पिझ्झा-बर्गर संस्कृतीशी लढाई
2 तरुणाईचे असे का झाले?
3 उद्देश आणि नियोजन यांची कसरत
Just Now!
X