यात्रा काळात ३ ठिकाणी तात्पुरते बसस्थानक

आषाढी यात्रेच्या पाश्र्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकण आदी विभागातून ३ हजार ६०० जादा बसची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत ३ ठिकाणी तात्पुरती बसस्थानके उभारण्यात आली आहेत.

आषाढी एकादशीचा सोहळा ४ जुल रोजी होत आहे. यात्रेसाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यांच्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून जादा बसची सोय करण्यात आली आहे. शहराच्या बाहेर ३ ठिकाणी चंद्रभागा, भीमा व विठ्ठल अशी तात्पुरती बसस्थानके उभारण्यात आली आहेत. पुणे रोडवरील चंद्रभागानगर यात्रा बसस्थानकावर कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागातील बस ये-जा करतील. नदीच्या पलीकडे तीन रस्ता येथे भीमा यात्रा बसस्थानकावर विदर्भ, मराठवाडा, विजापूरकडे जाणाऱ्या बस ये-जा करतील. नवीन सोलापूर रोडवर उभारण्यात आलेल्या विठ्ठल यात्रा बसस्थानकावर नाशिक, नगर, जळगाव, बुलढाणा येथील बस येणार आहेत. सर्व बसस्थानकांवर २४ तास आरक्षण, पिण्याचे पाणी, वीज, प्रथमोपचार केंदाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तात्पुरती बसस्थानके उभारण्याच्या कामास वेग आला असून याठिकाणी निवाऱ्यासाठी पत्राशेड तसेच चिखल, दलदल होऊ नये यासाठी मुरुमीकरण करण्यात येत आहे.

तालुक्यातील बाजीराव विहिर येथे होणाऱ्या िरगण सोहळ्यासाठी जादा १०० बस सोडण्यात येणार आहेत. शहरासह विविध विभागात १२  ठिकाणी चेकिंग पोस्ट (तपासणी नाका), ३ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.तसेच दुर्घटना घडल्यास ३ क्रेनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत. यासाठी ४०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, यात्रा कालावधीत रिक्षावाले व खासगी वाहनधारकांकडून भाविकांची लूट होते. या पाश्र्वभूमीवर भाविकांना चंद्रभागा, विठ्ठल व भीमा बसस्थानकावर ये-जा करण्यासाठी शटल सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी नाममात्र १० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे.