या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास आराखडय़ातील अनेक कामे रखडली; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता

लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास रखडला गेला आहे. काँग्रेस सरकारने पंढरपूरच्या विकासासाठी मोठय़ा घोषणा करून आरखडा मंजूर केला. त्यासाठी निधीही दिला. मात्र एक-दोन कामांव्यतिरिक्त इतर कामे झाली नाहीत. सत्ताबदल झाल्यावर फडणवीस सरकारने विकासकामे मार्गी लावण्याची घोषणा केली, तसेच ‘नमामी चंद्रभागा’ हे अभियान सुरू केले. पण, विकासकामांना अद्याप गती मिळालेली नाही.

समतेची पताका खांद्यावर घेऊन वैष्णव शेकडो वर्षांपासून पायी चालत पंढरीला येतात. पायी वारी करणारे हे वारकरी अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. देश-विदेशातील अभ्यासक वारकऱ्यांबाबत अभ्यास करीत आहेत. पालखी प्रस्थान हे ठरलेल्या तिथीलाच होते. पालखीचा दुपारचा, रात्रीचा मुक्काम हा ठरलेल्या ठिकाणीच होतो. यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. वारी म्हणजे व्यवस्थापनशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच पायी चालत येणारे भाविक हे समान मानले जातात. त्यांच्यात कोणत्याही प्रकारची उच्च – नीचतेची भावना नसते. असा हा शिस्तप्रिय वारकरी संप्रदाय पंढरपूरला येतो त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांवर सरकार कोटय़वधी रुपये खर्च करते, पण प्रत्यक्षात कामे मार्गी लागत नाहीत.

पंढरपूरच्या विकासासाठी काँग्रेस सरकारने २००८ साली एक आराखडा मंजूर केला. २००८ ते २०१२ या कालावधीत पंढरपूर- देहू -आळंदी या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे सरकारने ठरविले होते. यामध्ये पंढरपूरच्या विकासकामांची यादी खूप मोठी होती. चंद्रभागा नदीच्या पलतीरावर घाट बांधणे, झुलता पूल, नदीच्या पलतीरावर वारकऱ्यांसाठी राहण्याची जागा, शौचालय, शहरात विविध ठिकाणी रस्ते आदी कामांसाठी १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. पुढे या आराखडय़ाला एक एक वर्षांची मुदतवाढ दिली गेली. प्रत्यक्ष पाहता चंदभागा नदीच्या पलतीरावर घाट बांधला, तोही अर्धवट. चंद्रभागा नदीत पाणी राहावे यासाठी गुरसाळे बंधारा बांधला, शौचालये बांधली, अशी काही हाताच्या बोटांवर मोजता येतील अशी कामे झाली. पण मंजूर आराखडय़ातील अनेक कामे रखडली आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नवीन सरकारने विकासकामांना प्राधान्य दिले. अडीच वर्षांत पंढरपूर शहरातील प्रमुख ११ सिमेंटचे रस्ते मंजूर झाले. यापैकी तीन रस्ते पूर्ण झाले असून, तीन रस्त्यांची कामे मार्गावर आहेत. संत एकनाथ महाराज यांची पालखी तालुक्यातील कौठाली येथून पुढे पंढरपूरला येताना पालखीला नदीपात्रातून जावे लागत होते.

महाराजांच्या या पालखीला जाण्यासाठी पूल व्हावा अशी मागणी जुनी होती. हा पूल मुदतीत पूर्ण झाला. शहरात शौचालये मोठय़ा प्रमाणात बांधण्यात आली. अशी काही कामे मार्गी लागली आहेत. मात्र, नागरिकांची अद्याप अपेक्षापूर्ती झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च लक्ष घालून विकासकामे पूर्ण करावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

नमामी चंद्रभागाअभियानाचे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमामी गंगा’ हे अभियान सुरू केले. त्या धर्तीवर ‘नमामी चंद्रभागा’ अभियानाची घोषणा झाली. त्याला निधीही मंजूर झाला. त्यास एक वर्ष पूर्ण झाले. मुंबईत यासंदर्भात प्राधिकरणाची एक बठक वगळता कोणतीही कामे सुरू झाली नाहीत. आराखडा अद्यापही कागदावरच आहे. विकासाची कामे मार्गी लागावीत ही नागरिकांची अपेक्षा असली तरी निधीअभावी कामे पुढे सरकू शकलेली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च लक्ष घालावे, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला तरच विकासकामे मार्गी लागू शकतील, अशी नागरिकांची भावना आहे.

मराठीतील सर्व वारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur development issue sant tukaram and sant dnyaneshwar wari palkhi yatra
First published on: 04-07-2017 at 03:01 IST