या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वास पवार, फलटण

चला जाऊ पंढरी पंढरी

चला पाहू पंढरी पंढरी

सकळ तीथ्रे थोर माझी पंढरी पंढरी

भक्तांची वाट जीथे देवची पाहे

युगे अठ्ठावीस तिष्ठत राहे

वर्ण जाती भेद सारे विसरती

करणी लागती एकमेका

याचेच मूर्तिमंत उदाहरण असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्य़ातील शेवटच्या बरड (ता. फलटण) मुक्कामी विसावला.

ध्यान मनी विठ्ठलाची आस घेऊन लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदंगांच्या गजरात महानुभाव पंथाची दक्षिण काशी फलटण येथे पहाटे पादुकांची पूजा आरती झाली. सकाळी कर्णेकऱ्याने तिसरा कर्णा वाजविला आणि ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’ चा एकच जयघोष करत पालखीने सकाळी साडेसहा वाजता फलटण सोडले आणि पालखी सोहळा पंढरीच्या ओढीने पुढे निघाला.

कन्या सासुराशी जाये

मागे परतोनी पाहे

तसे जाले माझया जिवा

केव्हा भेटसी रे केशवा

असे म्हणत फलटणकरांच्या सेवेने तृप्त होत वारकरी समुदायाने निरोप घेतला. फलटण येथून बरडकडे प्रस्थान ठेवल्यानंतर शहराबाहेरील नीरा उजव्या कालव्यावरील रावरामोशी पुलावर भाविकांची माउलींचे दर्शन घेण्यासाठी झुबंड उडाली. आजही तरडगाव फलटणप्रमाणे अंतराचा मोठा पल्ला (अठरा किलोमीटर) बरडपर्यंत गाठण्यासाठी पालखी सोहळ्यात शिस्तीतही एक चतन्य होते. यानंतर हा सोहळा विडणी येथे न्याहरीसाठी थांबला. विडणी येथे सरपंच ग्रामस्थ व श्रीराम साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. विडणी येथील न्याहरी व अल्पशा विश्रांतीनंतर सोहळा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पिप्रंद कडे मार्गस्थ झाला. पिप्रंद येथे सोहळ्याचे स्वागत गावकऱ्यांनी केले. माउलींच्या पादुकांना स्नान घालून वारीतील सर्व िदड्यांच्या वतीने माउलींना नवेद्य दाखविण्यात आला. दुपारच्या भोजनानंतर मार्गस्थ झालेला हा सोहळा सायंकाळच्या विसाव्यासाठी वाजेगाव येथे विसावला. ग्रामस्थांनी माउलींच्या जयघोषात स्वागत केले. दुपारचा अध्र्या तासाचा विसावा घेऊन माउलींचा पालखी सोहळा बरड (ता. फलटण) कडे मुक्कामाला रवाना झाला. बरड येथील पालखी तळावर माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामपंचायतीने व ग्रामस्थ, विविध सामाजिक सहकारी संस्था मंडळांच्या वतीने करण्यात आले. सायंकाळच्या समाज आरतीनंतर भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या.

बरड येथील माउलींचा मुक्काम हा सातारा जिल्ह्य़ातील शेवटचा मुक्काम असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा उद्या दुपारी सोलापूर जिल्ह्य़ाात प्रवेश करणार आहे. या वेळी दोन्ही जिल्ह्य़ांच्या सीमेवर सातारा व सोलापूर जिल्ह्य़ातील मुख्य शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व वारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant tukaram and sant dnyaneshwar wari palkhi yatra 2017
First published on: 28-06-2017 at 02:46 IST