News Flash

वसई ग्रामीण भागांत मृत्यूच्या संख्येत घट

ग्रामीणमधील मृत्युदर कमी करण्यासाठी योग्य उपचार पद्धती व आरोग्य मोहिमेवर भर देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या होत्या.

करोना प्रातिनिधिक छायाचित्र

नागरिकांना मोठा दिलासा

वसई : शहरी भागाप्रमाणेच वसईच्या ग्रामीण भागातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत १९ जणांचा बळी गेला होता. मात्र जून महिन्याची सुरुवात होताच पहिल्या सात दिवसांत एकही रुग्ण दगावला नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागालाही करोनाची झळ बसली होती. दिवसेंदिवस विविध ठिकाणच्या भागांतून रुग्ण आढळून येत असतानाच मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले होते. एकापाठोपाठ एक असे रुग्ण दगावत असल्याने ग्रामीण भागाची चिंता अधिकच वाढली होती. यात तर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात १९ जणांचा मृत्यू झाला होता.

त्या वेळी ग्रामीणमधील मृत्युदर हा ४.७३ टक्के इतका झाला होता. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ यांनी तातडीने वसई ग्रामीणमधील आरोग्य केंद्रांना भेटी देत आरोग्य विभागाची बैठक घेतली होती.

ग्रामीणमधील मृत्युदर कमी करण्यासाठी योग्य उपचार पद्धती व आरोग्य मोहिमेवर भर देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या होत्या. तर जे काही खासगी दवाखाने चालविणारे डॉक्टर करोना संशयित व करोनाची लक्षणे असणारे रुग्णांवर परस्पर उपचार करीत असताना रुग्ण दगवल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने करोनाबाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार  देण्यास सुरुवात केली होती. मात्र  २० मे  नंतर हळूहळू रुग्णवाढीचा वेग कमी झाला तर मृत्यूचे होण्याच्या प्रमाणातही घट झाली. २४ ते  ३० मे या दरम्यान फक्त २ रुग्ण दगावले होते.  त्या वेळी मृत्युदर ३.७६ टक्के इतका झाला होता.

त्यानंतर जून महिन्याची सुरुवात होताच पहिल्या आठवड्यात एकही रुग्ण दगावला नसल्याने मृत्युदर आणखीनच खाली असून ७ जूनपर्यंत ३.६४ टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये २ हजार ५५४ इतके करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ९३ रुग्ण दगावले आहेत. तर १ हजार ९८४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. अजूनही ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:01 am

Web Title: corona virus infection decline in vasai death toll in rural areas akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दोन तासांच्या पावसात सखल भाग पाण्याखाली
2 कोविड रुग्णालये रिकामी
3 गरजू विद्यार्थ्यांकडे साधनसामग्रीचा अभाव
Just Now!
X