दूरध्वनी बंद मात्र समाजमाध्यम वापरणे महागात पडले

वसई : नालासोपारा येथे दोन वर्षांंपूर्वी झालेल्या योगिता देवरे या महिलेच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कार्तिक सिंग याला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने उत्तर प्रदेश येथून अटक केली होती. आपले नाव आणि ओळख लपवून तो रहात होता. परंतु समाजमाध्यमाचा वापर करत असल्याने पोलिसांनी माग काढून त्याला अटक केली.

नालासोपारा पुर्वेच्या यशवंत एम्पायर इमारती समोर १ मार्च २०१९ रोजी योगिता देवरे (३८) या महिलेचा मृतदेह सापडला होता. गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह या परिसरात आणून टाकण्यात आला होता. तुळींज पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून हत्येची उकल केली होती. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली होती. या महिलेच्या प्रियकराच्या दोन अल्पवयीन मुलींनी हत्येचा डाव आखला होता. याप्रकरणी पोलिसांनी हत्या, हत्येचा कट रचणे आदी विविध कलमांसह ६ आरोपीवर गुन्हे दाखल केले होते. यातील ५ आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी कार्तिक सिंग हा फरार होता.

गुन्हे शाखा ३ च्या पथकाचे प्रमुख प्रमोद बडाख आणि नत्यांच्या पथकाने या फरार आरोपीचा शोध सुरू केला होता. मात्र तो फोन वापरत नव्हता तसेच इतर सर्व नातेवाईकांशी त्याने संपर्क तोडला होता. त्यामुळे कसलाही दुवा लागत नव्हता. पोलिसांनी तपास करत तो समाजमाध्यमावर बनावट खात्याने वावरत असल्याचे लक्षात आले. इन्स्टाग्रामवर त्याचे एक छायाचित्र पोलिसांना आढळले. त्यात तो मध्य प्रदेश येथील एका टोल नाक्यावर काम करत असल्याचे दिसले. त्यावरून पोलिसांनी त्याचा माग काढला. दरम्यान तो उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यत फरार झाला होता. तेथून पोलिसांनी त्याला अटक केली. कार्तिक सिंग हा आरोपी मुलीचा प्रियकर होती. प्रेयसीच्या सांगण्यावरून त्याने या हत्येत सहभागी झाला होता, असे पोलीस निरीक्षक बडाख यांनी सांगितले.