वसई : गणेशोत्सवासाठी वसई-विरार भागातून मोठय़ा संख्येने नागरिक हे कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जात असतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष बससुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास २५० गाडय़ा सोडण्याचे नियोजन पालघर एसटी महामंडळाकडून करण्यात आहे. यासाठी १६ जुलैपासून प्रवासासाठीचे आरक्षण सुरू केले जाणार आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. कोकणात मोठय़ा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत असल्याने दरवर्षी मोठय़ा संख्येने नोकरदारवर्ग हे गणेशोत्सवासाठी गावी जातात. त्यांच्या सेवेसाठी एसटी बस धावत असते. मागील वर्षी करोनाचे संकट असल्याने राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. परंतु या वर्षी करोनाच्या सर्व नियमांचे पालन करून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहे. नुकतेच परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनीही कोकणात जाणाऱ्या नोकरदारवर्गासाठी विशेष गाडय़ा सोडण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पालघर एसटी महामंडळानेही विशेष गाडय़ा सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केले आहे. यात वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून २५० गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवासाठी ४ ते १० सप्टेंबर  दरम्यान या गाडय़ांचा प्रवास सुरू राहील. तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाडय़ा कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. चाकरमान्यांना जाण्याचे व परतीच्या प्रवासाचे एकच आरक्षण करता येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व बस र्निजतुकीकरण केल्या जाणार असून प्रवाशांना मुखपट्टी लावूनच प्रवास करावा लागणार आहे. सद्य:स्थितीत पालघरमधून २५० गाडय़ांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची संख्या जर वाढली तर आणखीन गाडय़ा वाढविल्या जातील, असे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे.