Food Poisoning Death Case Bhayandar Mumbai भाईंदरमधील बजरंग नगर परिसरात एका कुटुंबातील सहा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेत ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला असून इतर पाच जणांवर उपचार सुरु आहे.

मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव दीपाली मौर्या (३) असे असून ती आई-वडील, दोन बहिणी आणि काकासह राहत होती. रविवारी तिचे वडील रमेश मौर्या यांनी बाजारातून चिकन आणले होते. कुटुंबाने दुपारचे जेवण केल्यानंतर सर्वजण अचानक बेशुद्ध पडले. संध्याकाळी रमेशचे मेहुणे घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

त्यामुळे सर्वाना तात्काळ पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत चिमुकली दीपालीला मृत घोषित करण्यात आले. आई, वडील आणि काकांची प्रकृती उपचारानंतर सुधारत आहे. मात्र तिच्या दोन बहिणी अनामिका (८) आणि चहात (६)यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात ही घटना विषबाधेमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून चिकन, उकडलेले अंडे, वडापाव, चपाती, देशी दारूची रिकामी बाटली, ताडी तसेच उलटीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे.