वसई: सोमवारी बारावीचा निकाल लागला. यात वसईच्या ऋषि वाल्मिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षेस बसलेले ७६ वर्षीय गोरखनाथ मोरे हे सुद्धा उत्तीर्ण झाले आहेत. १२ वी कला शाखेतून ते उत्तीर्ण झाले असून त्यांना ४४.५० टक्के गुण मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
मीरा रोड येथे राहणारे गोरखनाथ मोरे हे नौदलातून निवृत्त झाले असून त्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नायगाव कोळीवाडा येथील ऋषि वाल्मिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षेसाठी १७ क्रमांचा फॉर्म भरला होता. त्यांनी वसईतील न्यू इंग्लिश स्कुल या केंद्रावर ही परीक्षा दिली होती. याशिवाय तोंडी परीक्षा ही चांगल्या प्रकारे दिली होती.
सोमवारी बारावीचा निकाल लागला त्यात गोरखनाथ मोरे हे उत्तीर्ण होत यश मिळविले आहे. शिक्षणाला कोणतेही वयाचे बंधन नसते हे त्यांनी यातून दाखवून दिले आहे.
बारावी कला शाखेतून ते उत्तीर्ण झाले असून त्यांना ४४.५० टक्के गुण मिळाले आहेत.
त्यांचा या वयात ही शिकण्याचा उत्साह पाहून आम्हाला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया विद्यालयाचे सचिव रवी भाटकर यांनी दिली आहे. आता त्यांना यापुढे एलएलबीचे शिक्षण घ्यायची इच्छा बोलून दाखविली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मनात शिकण्याची इच्छा असेल कोणत्या वयात शिकता येते ते त्यांनी करवून दाखविले आहे असेही भाटकर यांनी सांगितले.
कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा मला कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र त्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी मी ठरविले की बारावी परीक्षा द्यायची त्यासाठी मी नायगाव येथील महाविद्यालयातून बारावी कला शाखेसाठी अर्ज केला होता. त्यात मी चांगल्या प्रकारे गुण मिळवून उत्तीर्ण झालो आहे अशी प्रतिक्रिया गोरखनाथ मोरे यांनी दिली आहे. आता पुढील कायद्याचे शिक्षण घेण्याची माझी इच्छा आहे असेही त्यांनी सांगितले आहे.