वसई:  रेल्वे उपनगरीय गाडय़ा व रेल्वे स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात ९५३ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी ३२६ गुन्हे उघडकीस आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९५ ने गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत  मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. दिवसेंदिवस या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार वाढली आहे. विशेषत: विरार, नालासोपारा, नायगाव, वसई ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. याच गर्दीचा गैरफायदा भुरटे चोर घेऊ लागले आहेत.

मोबाइल चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे प्रकार अशा विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत. मध्यंतरी करोना संकट काळात रेल्वे प्रवासावर मर्यादा असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र निर्जंबध शिथिल होताच रेल्वे उपनगरीय गाडय़ांमधून प्रवास करणारे प्रवासी वाढले. याच गर्दीचा गैरफायदा गुन्हेगारांनी उचलला आहे. मीरारोड ते वैतरणा यादरम्यान २०२२ मध्ये  ९५३ गुन्हे घडले आहेत त्यापैकी ३२६ गुन्हे उघडकीस आणण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. तर अजूनही ६२७ गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

तर २०२१ मध्ये ५५८ इतके गुन्हे घडले होते त्यातील २४४ गुन्हे उघडकीस आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या ही ३९५ ने वाढली आहे.

या गुन्हेगारीला रोखण्यासाठी रेल्वे स्थानक परिसर, ज्या ठिकाणी जास्त गुन्हे घडतात अशी ठिकाणे त्या ठिकाणी गस्त घातली जात आहे. तर काही संशयित असेल तर त्याची तपासणी केली जाते अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.

प्रवाशांची सतर्कता महत्त्वाची

रेल्वेतून प्रवास करतात काही प्रवासी बेफिकीरपणे राहतात. तर काही वेळा प्रवासी झोपून जातात याचा फटका प्रवाशांना बसत असतो. प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवल्या पाहिजेत.  याशिवाय प्रवासादरम्यान एखादी संशयास्पद गोष्ट दिसली तर त्यांची  माहिती द्यावी, असे आवाहन   पोलिसांनी  केले आहे.

दोन वर्षांतील गुन्हे 

वर्ष       घडलेले       उघड 

२०२१ –       ५५८         २४४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२-        ९५३         ३२६