कल्पेश भोईर

वसई, विरार शहरात वीज चोरीला आवर घालण्यासाठी महावितरणने वीज चोरी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. नऊ महिन्यांत शहरांत २ हजार १०८ वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत आतापर्यंतची महावितरणची सर्वात मोठी कारवाई आहे.वसई, विरार शहरासह वाडा विभागात महावितरणच्या वसई मंडळातून वीजपुरवठा केला जातो. मात्र काही ठिकाणी मीटरमध्ये फेरफार करून, मुख्य वीज जोडणीच्या सव्र्हिस वाहिनीला टॅपिंग करणे, छुप्या मार्गाने आकडे टाकणे अशा प्रकारे वीज चोरी केली जाते. तर काही भागात बेकायदा चाळी व बांधण्यात आलेल्या घरांना चोरीची वीज वापरली जाते.

शहरात दरमहा सरासरी १९० ते २०० मेगा युनिट इतकी वीज लागते. त्यातून होणारी वीजगळती वगळता बहुतांश तोटा हा वीज चोरीमुळे होतो. २०२१- २२ मध्ये १ हजार २३७ इतक्या वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यामध्ये सुमारे २१ लाख २५ हजार ५५९ युनिटची ३ कोटी ५६ लाखाची वीज चोरी झाली. ३१८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर २०२२-२३ मध्ये २ हजार १०८ जणांवर कारवाई झाली. या चोरांनी सुमारे ४३ लाख २४ हजार ७६२ युनिटची ६ कोटी ९८ लाखाची वीज चोरी उघड झाली आहे. यात ३९८ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांनी सांगितले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षांत कारवाईची संख्या ही ८७१ वाढली आहे.

आता व्यावसायिक व औद्योगिकवर लक्ष्य
वीज चोरीच्या घटनांना पूर्णत: आवर घालण्यासाठी महावितरणने टप्प्याटप्प्याने कारवाईचे नियोजन केले आहे. शहरात औद्योगिक क्षेत्रही झपाटय़ाने विकसित होत आहे. याशिवाय व्यावसायिक दुकाने ही मोठय़ा संख्येने वाढत आहेत. अशा ठिकाणांच्या वीज मीटरची तपासणी केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके नियुक्त केली जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज चोरी थांबविण्यासाठी सातत्याने आता वसई, विरार , वाडा या विभागात कारवाया सुरू केल्या आहेत. ही मोहीम आता अधिक तीव्र करून वीज चोरीचे प्रमाण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. – राजेश चव्हाण, अधीक्षक अभियंता महावितरण वसई