वसई: विरारमध्ये अनधिकृत इमारत कोसळून १७ जणांचा बळी गेल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. गणेशोत्सवानंतर त्यावर कारवाईला सुरुवात केली जाईल असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरात रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली अनधिकृत इमारत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून १७ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले. याशिवाय घटनेनंतर अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील अनधिकृत बांधकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी या घटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून यातील काही बांधकामे ही धोकादायक स्थितीत आहेत. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल असे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच या कारवाईसाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपला पाठींबा असल्याचे यावेळी सांगितले. गणेशोत्सव संपल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली जाईल असेही नाईक यांनी सांगितले आहे. जुन्या कालखंडात चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे दुर्घटनेची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.
अनधिकृत बांधकामांची चौकशी
शहरात उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे एका दिवसात उभी राहिलेली नाहीत. ही परिस्थिती मागील ३० ते ३५ वर्षातील आहे. ज्यांच्या कार्यकाळात ही बांधकामे उभी राहिली त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल आणि त्यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले आहे.