वसई- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा सांगितला आहे. ठाकूर यांनी चव्हाण यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत.

हेही वाचा – “पंतप्रधान हा देशाचा, मोदींनी भाजपाचा प्रचार करू नये”, उद्धव ठाकरे यांचा मोदी आणि शाहांवर घणाघात

हेही वाचा – पालघर जिल्ह्यातून १०० कोटींची वसुली, आमदार ठाकूरांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवर आरोप

पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी थेट पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरच हल्ला चढविला होता. चव्हाण यांच्यावर जिल्ह्यातून १०० कोटी रुपये वसुलीची जबाबदारी असून ते महामार्गावरील हॉटेलमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांच्या बैठका घेत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. मी निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने बैठका घेतल्या होत्या. पैसे मागितल्याचे आरोप सिद्ध करावे अथवा माफी मागावी असे प्रतिआव्हान दिले होते. मात्र हितेंद्र ठाकूर आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. ॲड प्रदीप पांडे यांच्या वतीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटिशीला आता ठाकूर काय उत्तर देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.