वसई: भर रस्त्यात एका रिक्षाचालकाने रिक्षामध्येच अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भाईंदर येथे उघडकीस आली आहे. या मुलीने बचावासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली. या प्रकारात मुलगी जखमी झाली आहे. नवघर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती भाईंदर मध्ये राहते. सोमवार १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास नवघर येथे क्लासला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. मात्र रिक्षाचालकाने नियमित रस्त्याने न नेता रिक्षा आडमार्गाने नेली. त्या मुलीला संशय आला होता. मात्र त्याने हा जवळचा रस्ता आहे असं सांगून वेळ मारून नेली. दरम्यान, रिक्षाचालकाने धावत्या रिक्षातच या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलीने प्रसंगावधान दाखवत चालत्या रिक्षातून उडी मारली. हा प्रकार पाहून रिक्षाचालक तेथून पसार झाला.  याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून बुधवारी नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीला रिक्षाचा नंबर माहित नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परिसराती सीसीटीव्ही तपासून काही संशयित रिक्षाचालकांना ताब्यात घेतले. त्यातील एकाला पीडित मुलीने ओळखले. कृष्णकांत मोर्या (४६) असे या रिक्षाचलाकाचे नाव आहे. मुलगी रिक्षात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन रिक्षाचाकाने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने यापूर्वी देखील असे प्रकार केले आहेत का त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दिली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून रिक्षातून पडल्याने तिला किरकोळ दुखापत झाली आहे.