भाईंदर :- भाईंदरमध्ये शाळकरी मुलं प्रवास करत असलेल्या मार्गांवर जीवघेणे खोल खड्डे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

पावसाच्या हजेरीनंतर मिरा भाईंदर शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याची बाब समोर आली होती. याबाबत राजकीय पक्षांनी तसेच नागरिकांनी आक्रोश व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने मुख्य मार्गांवरील खड्डे भरण्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण केले आहे. मात्र अद्यापही शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. यामुळे पायी प्रवास करणे, वाहन चालवणे आणि इतर कामानिमित्त बाहेर पडणे नागरिकांना कठीण झाले आहे.

काशिनगर भागात रस्त्यावर चक्क दोन फुटांपर्यंत खोल खड्डे पडल्याचे समोर आले आहे. यामुळे रस्त्याखालील पाणी आणि दगड थेट दिसून येत आहेत. या भागात अनेक गृहसंकुले असून लहान मुलं याच रस्त्याच्या कडेला बऱ्याचदा खेळत असतात. तसेच शाळेतून प्रवास करणाऱ्या मुलांचाही प्रवास याच मार्गांवरून होतो. परिणामी, कोणत्याही क्षणी अशा खड्ड्यात पडून मुलं जखमी होण्याची दाट शक्यता आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांच्या या समस्येबाबत स्थानिक नागरिक करण पवार यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध करून प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर प्रशासनाने हा खड्डा माती टाकून भरला आहे. तसेच लवकरच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.