वसई : राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या महापालिकेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे जनता दरबारच्या ठिकाणात बदल केल्याची माहिती समोर येत आहे.वसई विरार शहरात महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या महापालिका मुख्यालयाच्या सभागृहात राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.

वसई तालुका आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांना आपल्या समस्या किंवा तक्रारी मांडायच्या आहेत, त्यांनी आपल्या निवेदनाच्या तीन प्रती घेऊन जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी केले होते.मात्र, ऐनवेळी जनता दरबारच्या ठिकाणात बदल करण्यात आला असून विरार पश्चिमेतील बोळींज येथील बालाजी बँक्वेट हॉल येथे सकाळी १०.३० वाजता जनता दरबार पार पडणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

आचारसंहितेमुळे जनता दरबाराच्या ठिकाणात बदल

पालघर जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे महापालिकेत आयोजित जनता दरबारात कोणताही तांत्रिक किंवा कायदेशीर अडथळा येऊ नये, म्हणून जनता दरबाराच्या ठिकाणात बदल केले असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.