दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मच्छीमारांनी आपल्या बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात रवाना केल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसांपासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळीवाऱ्यामुळे मच्छीमारांना बोटी माघारी आणाव्या लागल्या आहेत. जवळपास शंभराहून अधिक बोटी या माघारी आल्या आहेत.
वसई पश्चिमेतील अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर आदी ठिकाणी सुमारे आठशेहून अधिक बोटी आहेत. १ ऑगस्ट पासून या मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मासेमारीसाठी जाण्यासाठी बोटींची डागडुजी, मासे साठवणुकीसाठी बर्फ, जाळी, इंधन, जीवनावश्यक वस्तू आदी गोष्टींची जमवाजमाव करून मच्छीमारांनी आपल्या बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी नेल्या होत्या. यंदाच्या मासेमारीची सुरुवात चांगली होईल अशी आशा होती. मागील दोन दिवसांपासून समुद्रात वादळीवारे असल्याने मासेमारी करणे धोक्याचे असते. त्यामुळे मच्छीमारांनी बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणण्यास सुरुवात केली आहे.

पाचूबंदर, नायगाव, अर्नाळा अशा विविध किनाऱ्यावर बोटी परत आल्या आहेत. मंगळवारी अर्नाळा किनाऱ्यावर काही बोटी संध्याकाळी आल्या तर काही बोटी रात्री उशिरा किनाऱ्यावर दाखल झाल्या. तर काही बोटी या जाफराबादच्या किनाऱ्यावर गेल्या होत्या. वसईतील १२२ बोटी या मासेमारीसाठी निघाल्या होत्या. यातील सर्वच बोटी या किनाऱ्यावर आल्या असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे. तर ‘स्वराज्य’व ‘साम्राज्य’ या बोटींचा अजूनही संपर्क झाला नाही. त्यांची माहिती घेण्याचे काम मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सुरू आहे. या वादळाने अस्मानी मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती आहे. लाखोंचे इंधन खर्चून तसेच सामग्री जमवून हात हलवत परत यावे लागल्याने मच्छीमार बांधव हवालदिल आहेत.

समुद्रात वादळीवारे निर्माण होण्याविषयी हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. त्यानुसार सर्व बोटींच्या मालकांना याबाबत सूचनाही दिल्या होत्या. त्यांच्या संपर्कात राहून माहिती घेण्यात आली होती. वसईतील मासेमारीसाठी गेलेल्या सर्व बोटी या किनाऱ्यावर पोहचल्या आहेत. – हेमंत कोरे, मत्स्यव्यवसाय अधिकारी, वसई

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boats ashore due to storm amy
First published on: 11-08-2022 at 00:04 IST