वसई: विरार शहरात पालिकेने प्रवाशांसाठी बस थांबे तयार केले आहेत. मात्र अनेक ठिकाणच्या बस थांब्याच्या समोरच अनधिकृत पणे वाहने उभी करणे, बस थांब्याला लागून खाद्यपदार्थ गाड्या उभारणे यामुळे हे बस थांबे अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत.

वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडून शहरातील विविध ठिकाणच्या भागात परिवहन सेवा पुरविली जाते. परिवहन सेवेच्या बसेस थांबण्यासाठी व प्रवाशांना उभे राहण्यासाठी पालिकेने बस थांबे तयार केले आहेत. परंतु काही ठिकाणच्या भागात या बस थांब्याची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी उभे राहण्यासही प्रवाशांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

यातले बहुतांश बसथांबे हे बाजार, रेल्वेस्थानक, मुख्य रस्ते अशा वर्दळीच्या ठिकाणी आहेत. पण, गेल्या काही काळात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी खाऊगल्ल्यांच्या संख्येत वाढ झाल्याने आता हे बसथांब्याच्या जवळच खाद्यपदार्थ गाड्या उभारल्या जात आहेत. खाऊगल्ल्यांनी काही बसथांब्यांना लागूनच अतिक्रमण करून आपले सामान ठेवले आहे. काही ठिकाणी थेट खुर्च्याच मांडून ठेवले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच येथे येणारे ग्राहक बसथांब्याच्याच परिसरात गर्दी करत असल्याने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बस थांब्यांऐवजी प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.

तर दुसरीकडे  बस थांब्याच्या समोर अनधिकृत पणे वाहने उभी करण्याचे प्रकार घडतात. तर काहीवेळा गर्दुल्ले ही त्या ठिकाणी येऊन थांबत आहेत. अशा प्रकारामुळे बस थांब्यावर जाण्यास प्रवाशांना अडथळे येतात. नायगाव पूर्व व पश्चिम अशा रेल्वे स्थानकाला लागूनच बस थांबे आहेत त्याठिकाणी दररोज अनधिकृत पणे वाहने उभी केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. पालिकेने शहरातील बस थांब्याची पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. याबाबत पालिकेच्या परिवहन विभागाशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर  मिळाले नाही.

बसथांब्यांच्या परिसरात दुर्गंधी

खाऊगल्ल्यांच्या अतिक्रमणामुळे परिसरात अस्वच्छताही वाढली आहे. यांच्याकडून बसथांब्यांच्या परिसरात ओला आणि सुका कचरा टाकला जातो. तसेच कचरापेट्याही तिथेच ठेवतात. यामुळे बसथांब्यांच्या आवारात दुर्गंधी पसरत आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.