वसई: वसई विरार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नागरिक महापालिकेच्या बससेवेचा वापर करतात. पण, गेल्या काही काळात महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे वसईतील बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे. गर्दुल्याचं अतिक्रमण, तुटलेले नामफलक, तर काही ठिकाणी अक्षरशः बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

वसई विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. दररोज हजारो प्रवासी या बसेसमधून प्रवास करतात. बसने प्रवास करण्यासाठी नागरिक बस थांब्यांवर गर्दी करतात. पण बसथांब्यांची दुरावस्था झाल्यामुळे अनेक प्रवशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वसई पूर्व आणि पश्चिमेच्या बहुतांश भागातील बसथांब्यांवर छप्पर नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरीकांची गैरसोय होते. तसेच अनेकदा गाड्या उशिरा येत असल्यामुळे नागरिकांना ताटकळत भर पावसात बसची वाट पाहत उभं राहावं लागतं.

त्याचप्रमाणे वसईतील काही भागात बसथांब्यांचे नामफलक तुटल्यामुळे प्रवाशांचा, विशेषतः नवीन प्रवाशांना, मोठा गोंधळ होतो. कोणत्या ठिकाणी थांबा आहे, हे कळत नसल्याने अनेकदा प्रवासी चुकीच्या ठिकाणी उतरतात किंवा बस चुकवतात. तर पापडीसारख्या बाजारपेठेच्या ठिकाणी तर बसथांबाच नसल्यामुळे नागरिक थेट रस्त्याच्या कडेला गर्दी करतात. बस वेळेत न आल्यास या वर्दळीच्या ठिकणी प्रवाशांच्या गर्दीमुळे अनेकदा वाहतूक कोंडी सारखी समस्या उद्भवते. याशिवाय, बसथांब्यांच्या समोरच दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात, ज्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना किंवा उतरताना अडचणी येतात.

त्याचप्रमाणे वसईतील बऱ्याच ठिकाणचे बसथांबे हे आता गर्दुल्ले, भिकारी यांचे अड्डे बनू लागले आहेत. वसई स्थानक, तसेच बस आगारांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बसथांब्यांवर गर्दुल्ले आपले ठाण मांडू लागले आहेत. तसेच फुल विक्रेते, सायकलवरून खेळण्यांची विक्री करणारे फेरीवालेदेखील आपल्या कुटूंबासह बसथांब्यांवर आसरा घेऊ लागले आहेत. वसई पश्चिमेतील माणिकपूर भागात काही बसथांब्यांवर या फेरीवाल्यांनी अक्षरशः लहान मुलांसाठी झोपाळे बांधून, तसेच कपडे लटकवून बसथांब्यांच्या जागा बालकावल्याचे चित्र आहे.

बसथांब्यांशी संबंधित या वाढत्या समस्या पाहता महापालिकेने याची दखल घेऊन बसथांब्यांची दुरुस्ती करावी, अतिक्रमण हटवावे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या बस थांब्याची पाहणी करून त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे पालिकेच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.