विरार : वसई विरार परिसरात चाळ माफियांनी नवा व्यवसाय निर्माण केला आहे, बेकायदा शौचालये बांधून महिनाकाठी ते हजारो रुपये कमावत आहेत. वसईतील अनेक चाळमाफियांनी चाळी उभारल्या पण शौचालये बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे रहिवाशांची होणारी गैरसोय पाहता बेकायदा शौचालये उभारून दर महिन्याला त्याचे भाडे चाळकऱ्यांकडून घेतले जाते.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोटय़वधी रुपये खर्च करून वसईत हजारो शौचालये वसईत बांधली. परंतु हे अभियान वसई विरार महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी पोहोचलेच नाही. प्रत्येक घरटी २०० ते ५०० रुपये महिना शौचालयाच्या वापरासाठी भरावे लागतात.
नालासोपारा येथील कारगिल रोड परिसरातील यादव नगर, शर्मा वाडी, गुप्ता नगर, अशा अनेक बैठय़ा चाळींच्या परिसरात ३००० कुटुंबे राहतात. येथे रस्ते, पाणी, गटार याविषयी समस्या आहेतच पण मुख्य समस्या शौचालयांची आहे. चाळीमध्ये शौचालयच बांधले नसल्याने त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. गेली पंधरा वर्ष येथे हीच परिस्थिती आहे. येथे शौचालय उभारणीस जागा नसल्याने पालिका सार्वजनिक शौचालये उभारत नाही तर काही ठिकाणी पाण्याअभावी बांधलेली शौचालये ओस पडली आहेत.
चाळींच्या विकासकांनी घरे बांधताना शौचालये बांधण्याचे आश्वासन दिले. परंतु ती वापरण्यायोग्य नाहीत. काहींचे शौच खड्डे अत्यंत छोटे आहेत तर काही ठिकाणी गरजेपेक्षा अत्यंत कमी संख्येची शौचालये बांधली गेली. मग ही हक्काची शौचालये सोडून नागरिकांना नाइलाजाने विकासकांनी बांधलेल्या खासगी शौचालयाचा वापर करावा लागतो त्यासाठी पैसेही मोजावे लागतात. अनेक ठिकाणी शौचालये बांधण्याचे आश्वासन देऊ चाळ माफिया पसार झाले आहेत.
महिलांना तर उघडय़ावर जाण्याचाही पर्याय नसतो. काही वेळा तर मुलांचे शाळेचे शुल्क भरले नाही तरी चालेल पण शौचालयांसाठीचे पैसे भरावेच लागतात, अशी स्थिती होते.-मंगल माथूर, स्थानिक
करोनामुळे आर्थिक स्थिती खालावली तरी शौचालय वापरासाठी पैसे द्यावेच लागतात. दर महिना दोनशे रुपये न दिल्यास उघडय़ावर जाण्याचाअसुरक्षित पर्याय पत्करावा लागतो.-कन्हैय्यालाल ब्रीद, स्थानिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Business raising money toilets extortion citizens mafia vasai virar area amy
First published on: 06-04-2022 at 01:31 IST