घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक

वसई : माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी घटनास्थळापासून तब्बल ८० सीसीटीव्ही तपासत थेट आरोपींचे घरच गाठले.

वसईच्या अंबाडी रोड येथे मागील आठवडय़ात घरफोडीची एक घटना घडली होती. त्यावरून पोलिसांनी शोध घेत पाच जणांना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून अटक केली. हे आरोपी बिहारच्या पूर्णिमा जिल्ह्य़ातील असून फक्त चोरी करण्यासाठी वसई-विरार परिसरात येत होते, अशी माहिती वसई विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप गिरीधर यांनी दिली. या टोळीने केलेल्या घरफोडींच्या तीन गुन्ह्य़ांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेला साडेसहा लाखांचा मुद्देमालही  पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी चोरी करण्यासाठी शहरात येऊन भाडय़ाचे घर घेऊन राहायचे. दिवसा बंद घरांची रेकी करायचे. दोन जण कटावणीच्या साहाय्याने दार तोडायचे तर तीन जण बाहेर पाळत ठेवायचे, असेही गिरीधर यांनी सांगितले. यापैकी दोन आरोपी चोरीच्या गुन्ह्य़ात शिक्षा भोगून आले होते.

..पोलीस थेट आरोपींच्या घरात

माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला या घरफोडीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. त्यात काही आरोपी दिसले होते. मात्र चेहरे स्पष्ट नव्हते. पोलिसांनी त्यांचा पुढील सीसीटीव्ही चित्रण पाहून माग काढायला सुरुवात केली. याबाबत माहिती देताना साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले की, आरोपी वसई स्थानकातील पुलावरून पूर्वेला गेले. तेथून दोन रिक्षा बदलून महामार्गावर गेले होते. त्यानंतर बस पकडून ठाण्याला गेले आणि तेथून लोकलने कोपरखैरणे गेले. सुदैवाने ते ज्या ज्या मार्गावरून जात होते त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण मिळवून आम्ही त्यांच्या मागावर होतो. कोपरखैरणे स्थानकातून आरोपी ते राहात असलेल्या घरात गेले होते आणि आम्हीदेखील थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो, असे सानप यांनी सांगितले.