भाईंदर :-मिरा-भाईंदरमधील काशीगाव मेट्रो स्थानकाच्या उभारणीसाठी वादग्रस्त ठरलेली भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची जागा त्वरित महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काशीगाव मेट्रो स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या बांधकामासाठी लागणारी जागा ‘सेवेन इलेव्हेन’ या आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या मालकीची आहे. ही जागा महापालिकेच्या विकास आराखड्यात सेवारोडसाठी आरक्षित असून, २०२२ मध्ये महापालिकेने विकास हक्क प्रमाणपत्राच्या आधारे ही जागा ताब्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र, कंपनीने त्यास सहमती न दर्शवता चालू बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी केली, ज्यामुळे महापालिकेवर सुमारे २३ ते ३० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या वादामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या आराखड्यात बदल करून जिन्याचे स्थान नाल्यावर हलवले होते. परंतु, कंपनीने ही नाल्यावरील १३३ मीटर जागाही आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथे सुरू असलेले काम थांबवले, ज्यामुळे दोन वर्षांहून अधिक काळ हा प्रकल्प रखडला.

दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मेट्रो चाचणीसाठी मिरा-भाईंदर येथे आले होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सदर वादाची माहिती दिली. त्यानंतर फडणवीस यांनी आमदार नरेंद्र मेहतांना तातडीने बोलावून संबंधित जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत सूचना दिल्या. त्यांनी महापालिका आयुक्तांनाही याबाबत भेट घेण्यास सांगितले.

या हस्तक्षेपामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला काशीगाव मेट्रो स्थानकाचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत असून, स्थानकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 “मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रेडिट नोट किंवा अन्य मार्गाचा अवलंब करून ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचे मला सांगितले आहे.त्यामुळे फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी  मी देखील नागरी हितासाठी यावर सकारात्मकच पाऊल उचलीन.” नरेंद्र मेहता -भाजप आमदार ( मिरा भाईंदर शहर)