मयुर ठाकूर
भाईंदर : मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतरही काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याच्या उभारणीदरम्यान बाधित होणाऱ्या जागेचा तिढा सुटू शकलेला नाही. जमीनमालक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे काम थांबवले असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परिणामी मेट्रो प्रकल्प सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ अंतर्गत येणाऱ्या काशिगाव मेट्रो स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या बांधकामासाठी लागणारी जागा ‘सेवेन इलेव्हेन’ या आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या मालकीची आहे. ही जागा महापालिकेच्या विकास आराखड्यात सेवा रस्त्यासाठी आरक्षित असून, २०२२ मध्ये महापालिकेने विकास हक्क प्रमाणपत्राच्या आधारे ही जागा ताब्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र कंपनीने त्यास सहमती न दर्शवता चालू बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी केली, ज्यामुळे महापालिकेवर सुमारे २३ ते ३० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या वादामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या आराखड्यात बदल करून जिन्याचे स्थान जवळील नाल्यावर हलवले होते. परंतु कंपनीने या नाल्यावरील १३३ मीटर जागाही आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथील काम मागील वर्षभरापासून थांबवले होते.त्यामुळे जिन्यासाठी बाधित होणारी जागा ताब्यात घेण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने मेहता यांच्या कंपनीला विकास हक्क प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र कंपनीने त्यास नकार देत बाजारभावाप्रमाणे थेट रोख रक्कम देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, १४ मे २०२५ रोजी मेट्रो चाचणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरा भाईंदरमध्ये आले होते. त्यांना सदर परिस्थितीबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यावरून क्रेडिट नोट किंवा अन्य पर्यायी मार्गाने जागा हस्तांतरित करून काम सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची कबुली मेहता यांनी दिली होती. त्यानंतर प्रत्यक्ष जिन्याच्या उभारणीचे कामदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांनंतर हे काम पुन्हा थांबले आहे. जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम करण्यास कंपनीने नकार दिल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्यादरम्यान बाधित होणारी जागा ताब्यात घेण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने जमीनमालकाला विकास हक्क प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र जमीनमालक तयार नसल्याने सदर जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक संचालक (नगररचना) पुरुषोत्तम शिंदे यांनी दिली. तर याबाबत मेहता यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी तो स्वीकारला नाही
मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतरही आयुक्त सुस्त : मेहता
काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्यादरम्यान माझ्या कुटुंबियांच्या मालकीची जागा बाधित होत आहे. मेट्रो प्रकल्प हा माझ्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असून तो लवकर सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून आम्ही महापालिकेला नियमानुसार प्रक्रिया पार पाडून ही जागा ताब्यात घेण्याची विनंती करत आहोत. यामध्ये विकास हक्क प्रमाणपत्र घेण्यास आम्ही नकार देत आहोत. कारण मागील निवडणुकांमध्ये माझ्यावर विकास हक्क प्रमाणपत्र घेतल्याचे खोटे आरोप झाले होते. म्हणून आम्ही रोख रक्कम देण्याचा पर्याय अवलंबण्याची विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांना करत होतो.दरम्यान, चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले असता त्यांनी मला ‘क्रेडिट नोट’चा पर्याय स्वीकारून जागा देण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून लगेचच आम्ही महापालिकेला आगाऊ ताबा देत असल्याचे पत्र देऊन काम सुरू करण्यास परवानगी दिली.
मात्र मागील चार महिन्यांपासून महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कोणत्याही सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.याबाबत आम्ही सक्त भूमिका घेतल्यानंतर ऑगस्ट महिन्यात जागा ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतर प्रक्रियेबाबत पत्र पाठवले आहे. मात्र अजूनही आम्हाला काहीच कळवलेले नाही, तसेच सदर जागा ताब्यात घेण्यासाठी ते प्रयत्न करत नसल्याचे आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केले आहेत.