विरार : वसई-विरारमधील सागरी किनारा परिसरात असलेल्या पोलीस चौक्या मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने सागरी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसईचा सागरी किनारा संवेदनशील असतानाही पोलीस आयुक्तालयाने या चौक्यांची अजूनही दाखल घेतलेली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

वसई-विरार सागरी किनाऱ्यालगत असलेल्या गास, सत्पाळा आणि कळंब या तीनही पोलीस चौक्या दोन वर्षांपासून बंद आहेत. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर कळंबच्या समुद्र किनारी असलेल्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये अनैतिक व्यवहार होत असतात तसेच अनेक जोडपी, मद्यपी, गर्दुले हे सागरी किनारी वाट्टेल तसे वर्तन करत असतात. त्याचबरोबर अनेक पर्यटक मोठी वाहने सरळ सागरी किनाऱ्यावर घेऊन जातात. यामुळे अपघात होत आहेत. चौकीही बंद असल्यामुळे रात्री-अपरात्री या परिसरात काही पर्यटक मद्यधुंद होऊन फिरताना दिसतात. वसई तालुक्यातील नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारी गास- टाकीपाडा आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सत्पाळा नाका, कळंब नाका येथील पोलीस चौक्या संवेदनशील परिसरात आहेत. गास टाकीपाडा येथे अनधिकृत वस्त्या आहेत. त्यात तडीपार गुंड आणि बांगलादेशीय लोकांचे वास्तव्य असल्याचे अनेकवेळा पोलीस कारवाईतून समोर आले आहे. राजोडी, नवापुर, अर्नाळा समुद्र किनारी जाणाऱ्या पर्यटकांचा उच्छाद मांडलेला असतो. मेजवान्यातील मद्याच्या बाटल्यांचा खच किनाऱ्यावर पडलेला दिसतो. सागरी किनारा संवेदनशील असल्यामुळे दहशतवादी गतविधीचा धोका संभवतो.

एकीकडे वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात नवीन पोलीस ठाणे उभारले जात आहेत. ग्रामीण भागात गरज असतानाही पोलीस चौक्या बंद करण्याचा घाट सुरू आहे. नागरिकांनी मागणी करूनही या चौक्या सुरू करण्यात आल्या नाहीत, अशा तक्रारी आहेत.
सध्या पोलीस बळ कमी आहे. पण तरीही अर्नाळा पोलिसांकडून कळंब आणि सत्पाळा येथील परिसरात रात्रीची गस्त घातली जात आहे. तसेच चौक्यासाठी पोलीस बळाची मागणी केली आहे. लवकरच पोलीस बळ उपलब्ध होईल.

– राजु माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा पोलीस ठाणे