वसई: वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या जल्लोषात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र दहीकाला उत्सव साजरा केला जातो. यावेळी रंगीबेरंगी तसेच सजावट केलेल्या मातीच्या मडक्यांची मोठी मागणी असते. त्यामुळे पालघर तसेच स्थानिक भागातून मोठ्या प्रमाणावर मडकी बाजारात विक्रीस आणली जातात. यावेळीही बाजारात विविध रंगांची,आकाराची आणि किंमतीतील मडकी बाजारात दाखल झाली आहेत.

यंदा १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी तर दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणारा आहे. वसई विरार शहरातही मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. राजकीय पक्ष, विविध संस्थांच्या माध्यमातून तसेच अनेक मानाच्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन शहरात केले जाते. त्याचप्रमाणे शहरातील शाळांमध्ये लहान मुलांसाठी छोटेखानी दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या काळात इतर सणांच्या तुलनेत मातीच्या मडक्यांची मागणी मोठी असते. वसई विरार शहराच्या बाजारपेठांमध्ये पालघर तसेच स्थानिक भागातून विक्रीसाठी मडकी आणली जातात. 

बाजारात विक्रीसाठी आणलेली मडकी हि चिकट माती, गोडी माती आणि राखेपासून घडवली जातात. पावसाळ्यात  मडकी योग्यरित्या वाळत नसल्यामुळे एप्रिल-मे महिन्यातच मडकी तयार केली जातात. तर सणाच्या महिनाभरआधी मडक्यांवर रंगकाम, सजावट केली जाते. साध्या मडक्यांच्या तुलनेत ही मडकी आकर्षक दिसावीत म्हणून वॉटर कलर, फॅब्रिक कलर, चुना, रंगीबेरंगी मणी, हिऱ्यांनी ही मडकी सजवली जातात. यंदा बाजारात विविध आकारांची आणि सजावटीची मडकी अगदी ८० रुपयांपासून ३०० रुपये किंमतीपर्यंत विकली जात आहेत. तर विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार यंदा मोठ्या आणि आकर्षक पद्दतीने गोविंदा लिहिलेल्या, हिऱ्यांनी सजवलेल्या मडक्यांना मोठी मागणी आहे.

दहिहंडी, नवरात्री अशा सणांदरम्यान मातीच्या मडक्यांना मोठी मागणी असते. पण, गेल्या काही काळात मातीच्या मडक्यांची ऑनलाईन ऍप्स तसेच संकेतस्थळावरून होणाऱ्या खरेदीमुळे व्यवसायावर फार नाही पण काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे वसईतील मडके विक्रेत्या व्यावसायिक हेमा कुंभार यांनी सांगितले आहे. दहीहंडी असल्याने मातीच्या मडक्यांना चांगली मागणी आहे. विविध ठिकाणाहून आमच्या घरीच मडकी विकत घेण्यास ग्राहक येत असतात असे कामण येथील कुंभार चंदन रसाळकर  यांनी सांगितले आहे.