प्रवाशांची तासन्तास रखडपट्टी

वसई : भाईंदर खाडीवरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह रुग्णवाहिकांनाही बसला.

भाईंदर खाडीवरील जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे, ते आज, सोमवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हलक्या वाहनांसाठी एकच माíगका खुली ठेवली आहे, तर मुंबई आणि ठाण्याहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना पुलावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने रविवारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी नागरिक मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वर्सोवा पुलाच्या मुंबई-ठाण्याकडे जाणाऱ्या आणि वसई-पालघरच्या दिशेने येणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एका माíगकेवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची रखडपट्टी झाली.

रुग्णवाहिकांचाही खोळंबा

गंभीर रुग्णांना उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. जागाच नसल्याने जवळपास एक तासाहून अधिक काळ कोंडीत अडकून पडावे लागल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.